थोडं सांभाळून वागा, आमदार रोहित पवारांचा ‘या’ चार नेत्यांना इशारा
काही नेते त्यांच्या प्रति ज्या पद्धतीने वागत आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेला खटकत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
MLA Rohit Pawar warns four leaders : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर थेट निशाणा साधत सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी कार्यरत आहेत. मात्र, काही नेते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या प्रति ज्या पद्धतीने वागत आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेला खटकत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
त्यांनी आरोप केला की, स्टेजवर किंवा सार्वजनिक कार्यक्रमांत काही नेते सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर हात ठेवताना, त्यांना ओढताना दिसतात. अशा प्रकारची वर्तणूक अयोग्य असून, ती सन्मानाला धक्का देणारी आहे, असे त्यांनी म्हटले. जर कोणाला वाटत असेल की अजितदादांना नियंत्रित करता येत नव्हते, पण सुनेत्रा काकींना नियंत्रित करता येईल, तर तो त्यांचा भ्रम आहे, असा इशाराही त्यांनी दिला. सुनेत्रा पवार या सक्षम नेतृत्व असून पवार कुटुंबाचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यामुळे संबंधित चार नेत्यांनी सांभाळून वागावे आणि आदर राखावा, असा सज्जड दम त्यांनी भरला.
अजित पवारांच्या अपघाताविषयी सरकार संशय निर्माण करतय, सुनेत्रा पवारांनी भूमिका मांडावी
यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यू संदर्भातही प्रश्न उपस्थित केला. मी इव्हेंट किंवा स्टंट करत असल्याचा आरोप केला जातो; पण तुम्ही सत्तेत आहात, तर सत्तेचा वापर केवळ राजकारणासाठी न करता अजितदादांच्या मृत्यूबाबत एफआयआर नोंदवण्यासाठी प्रयत्न करा, असा टोला त्यांनी लगावला. कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या व्हिडिओवरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दादांची 40 वर्षांची कारकीर्द असताना केवळ दोन वर्षांचा कालखंड का दाखवण्यात आला? त्यांच्या मोठ्या कार्याला छोटं दाखवण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका त्यांनी केली.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख शरद पवार इतके भावूक झाले होते की, त्यांना काही गोष्टी लिहून वाचाव्या लागल्या. “या सगळ्या प्रसंगात आम्ही कोणतेही राजकारण केलेले नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी एका व्हिडिओचा दाखला देत दावा केला की, संबंधित चार नेते अजित पवार यांना त्यांच्या स्वतःच्या आमदार आणि कार्यकर्त्यांपासून दूर ठेवत होते. जर एखाद्या नेत्याला त्याच्या आमदारांपासूनच दूर ठेवले जात असेल, तर इतरांची परिस्थिती काय असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे नेते स्वतःचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी काही विषय जिवंत ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अखेर, अजित पवार यांचा या नेत्यांवर वचक होता; मात्र आता त्यांनी सुनेत्रा पवार यांचा योग्य तो आदर राखला पाहिजे, असा स्पष्ट संदेश देत रोहित पवार यांनी पक्षांतर्गत घडामोडींवर भाष्य केले आहे.
