आम्ही 2020 ला मदत केली पण आता…, पवारांना राज्यसभा देण्याबद्दल ठाकरे गटाची थेट प्रतिक्रिया

सन 2020 साली आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती.

  • Written By: Published:
Sharad Pawar

शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात आहेत. (Shivsena) त्यामुळे, प्रकृतीच्या कारणास्तव ते थांबणार की पुन्हा राज्यसभेवर जाणार याचं कोडं पुढील काही दिवसांतच उलगडेल. मात्र, राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही दावा केला आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात  शरद पवार यांचा कार्यकाळ संपत आहे.

सन 2020 साली आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. त्यानंतर संजय पवार आमचे उमेदवार दिलेले असताना आणि संख्याबळ असताना सुद्धा ते पराभूत झाले. आता संख्याबळानुसार आमचं संख्याबळ अधिक आहे. राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही, आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं मत मांडले आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं.

काँग्रेस की राष्ट्रवादी शरद पवार गट, राज्यसभेसाठी रस्सीखेच सुरु; बैठकीत काय घडलं?

वरुण सरदेसाई यांनी राज्यसभेच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा केला आहे. विधान परिषद आणि राज्यसभा या दोन वेगवेगळ्या जागा आहेत. शरद पवार हे मोठे नेते आहेत, शरद पवार उमेदवार म्हणून इच्छुक असतील आणि त्यांच्या नेत्यांकडून तसेच महाविकास आघाडीकडून तसं बोललं गेलं तरीही दोन वेगळे विषय आहेत, विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने ती जागा सुद्धा अर्थातच आमची असेल, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातून कोण निवृत्त होणार?

शरद पवार हे सर्वात मोठे नाव आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचाही समावेश आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.

follow us