Download App

महाराष्ट्राला काका-पुतणे दूधखुळे समजू लागलेत का?

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार व अजित पवार यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यात शरद पवार हे घेत असलेल्या भूमिकेबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आता पुण्यातील अजित पवारांबरोबर झालेल्या भेटीवर शरद पवारांनी सोलापूरात पत्रकार परिषदेत माहिती दिली. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने आम्ही भेटू शकते, असे जाहीर करून टाकले. त्यावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (social activist heramb kulkarni criticised ajit pawar and sharad pawar)

Sharad Pawar : अजित माझा पुतण्या, भेटण्यात गैर काय? गुप्त भेटीवर शरद पवारांचा सवाल

पवारांचे चिडणे व जरब बघून पत्रकार खूपच नरमाईने प्रश्न विचारतात. त्यामुळे कितीही विसंगती असल्या तरी इतर नेत्यांना जसे पत्रकार भंडावून सोडतात तसे काका-पुतण्याना करत नाहीत.
कालची भेट ही कौटुंबिक होती व काका-पुतण्याला भेटू शकत नाही का इतके हास्यास्पद विधान पवारांनी केले असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न असे-

१) कौटुंबिक भेट घेण्यासाठी सुरू असलेला कार्यक्रम सोडून यावे लागते का?

२) कौटुंबिक भेटीचे ठिकाण घर असते. दोघेही मुंबईत असताना तिथे पुतण्या घरी का येत नाही ?

३) अगदी पुण्यात भेटायचे तर बारामती हॉस्टेल किंवा ज्या सर्किट हाऊसला गाड्या लावल्या तिथे का नाही ?

४) ताफा सर्किट हाऊसला सोडून एकटीच गाडी का ?

५) वडिलांच्या खिशातून पैसे चोरले तरी बापासमोर पोरगा जायला घाबरतो. इथे अख्खा पक्ष चोरला. गंभीर आरोप केले तरी ४ वेळा कौटुंबिक भेटी झाल्यात…अशा पुतण्याचा राग का नसेल येत ?

६) काका बाहेर गेल्यावर उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय व्यस्त वेळापत्रक असलेले पुतणे उद्योगपतीशी अर्धा तास काय बरे बोलत असतील ?

७) कौटुंबिक भेटीत जयंत पाटील का लागतात ?

याचबरोबर हेरंब कुलकर्णी यांनी माध्यमांचेही कान टोचले आहेत. इतर नेत्यांसारखे पवार काका-पुतणे यांना धारेवर धरले जात नाहीत. म्हणून गेले कित्येक महिने त्यांना हवे तसे वागत हे फुटेज खात आहेत
आणि आपणही बावळट होऊन यांच्या लीला बघत आहोत. दोन्ही पवारांनी भेटी थांबवून अंतिम निर्णय जो असेल तो घोषित करावे म्हणजे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला भूमिका नक्की करता येईल…
सत्तेचे फायदे आणि विरोधी पक्षाची स्पेस घ्यायची असे दोन्ही कसे चालेल ? असा सवाल हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

Tags

follow us