Solapur News : लोकसभा निवडणुका अगदी जवळ (Lok Sabha Election 2024) आलेल्या असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur News) राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसमधील वजनदार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे, असा दावा माजी मंत्री शिंदे यांनी केला. इतकेच नाही तर भाजप नेते चंद्रकांत पाटील आज सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्याआधी या राजकीय घडामोडी घडत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही
अक्कलकोट येथील बोरोटी येथे आयोजित करण्यात आलेल्या हुरडा पार्टीत शिंदे यांनी हे वक्तव्य केले. भाजपकडून मला आणि प्रणितीताईंना आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे त्यामुळे आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही भाजपकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या जात आहेत. आता मी 83 वर्षांचा झालो आहे. प्रणिती सुद्धा पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रणिती शिंदेंच सोलापूर लोकसभेच्या उमेदवार! सुशीलकुमार शिंदेंनी दसऱ्यादिवशी केली अधिकृत घोषणा
आज मंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात, शिंदेंची भेट घेणार
दरम्यान, आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा आहे. त्यांच्याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहेत. आज सायंकाळी दोन्ही नेते सुशीलकुमार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहेत. सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मंत्री पाटील शिंदेंची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ही भेट प्रथमदर्शनी राजकीय नसली तरी यात काही राजकीय चर्चा होणारच नाही असेही नाही. त्यामुळे या भेटीची मोठी चर्चा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
सोलापुरसाठी भाजपाचा उमेदवार ठरेना
लोकसभा निवडणुकीत सोलापुरसाठी भाजपाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भाजप नेत्यांकडून याआधीही सुशीलकुमार शिंदे यांना भाजप प्रवेशाच्या ऑफर दिल्या गेल्या होत्या. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काल बोरोटी येथे कार्यकर्त्यांना त्यांनी स्वतःला आणि मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर आली होती असे सांगितले. पण, आपण आता काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचेही सांगून टाकले. मात्र तरीही राजकारणात काय होईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे सोलापुरच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.