Download App

बोअरवेल चालू असताना घडलं असं काही.., सुदैवाने जीवित हानी टळली

अहमदनगर : अहमदनगरमधील राळेगण म्हसोबा गावात एक अजब घटना घडलीय. एका शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेलचं काम सुरु असताना अचानक जुन्या बोअरवेलमधून मोटार आणि पाईप बाहेर निघाल्याची आश्चर्यकारक घटना घडली.

नेमकं काय घडलं?
नगर तालुक्यातील अनिल कोतकर नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेल घेण्याचं काम सुरु होतं. या शेतकऱ्याच्या शेतात याआधीह एक बोअरवेल होता. जुना बोअरवेल त्यांनी 25 वर्षांपूर्वी घेतला होता.

नवीन बोअरवेल घेत असताना १६५ फूट खोल बोअरवेल गेला होता. मात्र, अचानक तेथून जवळच असलेल्या जुन्या बोअरवेलमधून मोटार व पाईप बाहेर आलेत. ज्यावेळी हे पाईप बोअरवेलमधून बाहेर आले त्यावेळी हे पाईप साधारण 100 फूटावर उडाल्याचं चित्र दिसून आलं.

जेव्हा जुन्या बोअरवेलमधून पाईप आणि मोटार उडाली तेव्हा जुन्या बोअरवेलच्या आसपास कोणीही नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली असून हे कसं काय घडलं असाव? हा प्रश्न अनेकांना यावेळी पडला होता. हवेचा दाब जास्त आणि पाण्याचा सळ एकच असल्याचने दुसऱ्या बोअरवेलपर्यंत हवेचा दाब जाऊन हा प्रकार घडल्याचं बोअरवेल मजुरांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, नवीन बोअरवेल घेताना जुन्या बोअरवेलमधून पाईप आणि मोटार उडाल्याचे हा प्रकार जिल्ह्यात पहिल्यांदाच घडल्याने हा जिल्ह्याभरात एकच चर्चा रंगलीय.

Tags

follow us