अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी मिळणार का? याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अशात भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड थोपटत आपण लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तशी तयारीही शिंदे यांनी सुरु केल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्या विरोधात ते थेट पंगा घेत आहेत. दरम्यान, उमेदवारीवरुन या दोघांमध्ये सुरु असलेल्या रस्सीखेच आणि शीतयुद्धाचे परिणाम आता जाहीरपणे बघायला मिळत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) काल (26 फेब्रुवारी) अहमदनगर दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी ते छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॉप्टरने नगरला येणार होते. त्यांना येण्यास काहीसा अवधी होता. त्यांच्या स्वागतासाठी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले असे पदाधिकारी वाट पहात थांबले होते. (Sujay Vikhe-Ram Shinde sat side by side for half an hour but did not speak a single word)
यावेळी गडकरी यांची अर्धा तास वाट पाहत शेजारी शेजारी बसूनही विखे-शिंदे हे एकमेकांशी चकार शब्दही बोलले नसल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यामध्ये एका शब्दानेही संवाद घडला नाही. हा अबोला म्हणजे दोघांमध्ये लोकसभा उमेदवारीवरुन सुरु असलेल्या रस्सीखेच आणि शीतयुद्धाचे परिणाम असल्याचे बोलले जात आहे. पण या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली तरी हा अबोला भाजपला निवडणुकीत महाग पडणार का याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
राम शिंदे हे सुजय विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून आक्रमकपणे बाजू मांडत आहेत. विधानसभा निवजणुकीत विखे यांच्यामुळेच आपला पराभव झाला होता, असे जाहीरपणे शिंदे सांगत होते. तेच शिंदे आता पुन्हा आपण लोकसभेसाठी इच्छुक आहोत, हे जाहीरपणे सांगत आहेत. विखेंच्या विरोधात ते थेट पंगा घेत आहेत. शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेला राज्यातील बड्या नेत्यांची फूस आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.