Download App

राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? शरद पवारांच्या शिलेदारासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग

पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. भगीरथ भालकेंना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या महाराष्ट्रात नव्याने दाखल झालेल्या आणि विस्तारत असलेल्या पक्षाची ऑफर आहे. विधानसभेची उमेदवारी आणि पक्षाची जबाबदारी अशी ऑफर देणारा फोन राव यांच्या पक्ष कार्यालयातून भालके यांना असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र भालके यांनी यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून ते सध्या ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहेत. (Telangana CM Chandrashekhar Rao BRS Party Contact to NCP Leader Bhagirath Bhalke for Join party)

अभिजीत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे भालकेंची चलबिचल :

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचा नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणातील शेतकरी मेळाव्यात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना पवार यांनी पाटील यांना आगामी विधानसभा उमेदवारीबाबत संकेतही दिले. त्यामुळे भालके यांच्यासह राष्ट्रवादीतील कल्याणराव काळे आणि युवराज पाटील ही नेतेमंडळी नाराज आहे. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भालकेंनी शक्तीप्रदर्शन करत विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले.

याच दरम्यान, पवार यांनी सर्व नाराजांना सोलापुरात बोलावून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फारसे यश आलेले नसल्याचे सांगितले जात आहे. पवार यांचा दौरा पार पडल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच भालके यांना राव यांच्या पक्ष कार्यलयातून संपर्क करण्यात आला आहे. भालके यांना भारत राष्ट्र समितीमध्ये आणण्याची जबाबदारी चंद्रशेखर राव यांनी त्यांची मुलगी आणि एका अन्य निकटवर्तीय आमदारावर सोपविली आहे. भालके यांनी अद्याप राष्ट्रवादी सोडण्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र त्यांच्यासाठी राव यांनी लावलेली फिल्डिंग बघता आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नांदेड, औरंगाबादमार्गे केसीआर यांचा पक्ष सोलापूरपर्यंत पोहचला :

मागील काही दिवसांपासून चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने विस्ताराचे धोरण अवलंबिले आहे. आधी त्याच्या पक्षाचे नाव तेलंगाणा राष्ट्र समिती असे होते. मात्र विस्ताराचा विचार करुन राव यांनी पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असे केले. त्यानंतर त्यांनी नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री घेतली. मराठवाड्यात नांदेडमधील अनेक कार्यकर्त्यांना पक्षात घेतले. त्यानंतर औरंगाबदमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासारख्या नेत्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. आता राव यांच्या पक्षाने सोलापूरकडे कूच केली आहे.

Tags

follow us