अहमनगर : जामखेडमध्ये काल रात्री पोलीस आणि पिस्तुल धारक आरोपी यांच्यात मोठी चकमक झाली. थेट पोलिसांवर (Jamkhed Police) तीन तरुणांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलीस आणि आरोपी यांच्यात झालेल्या झटापटीत दोन पोलीस जखमी झाले. तर या घटनेत जामखेड पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला आहे. जामखेड शहरात मंगळवारी मध्यरात्री हा सिने स्टाईल थरार घडला. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (The accused held a pistol at the police jamkhed psi fired at the feet of the accused in self-defence)
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, जामखेड पोलीस पथक गस्तीवर असतांना अदनान शेख व प्रज्वल पालवे या दोन तरुणांनी पोलिसांचे वाहन अडवून पोलिसांना आपल्यासोबत घडलेली हकीकत कथन केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, जामखेड येथील तपनेश्वर रोडवरील अर्बन बॅंकेसमोर आरोपी प्रताप पवार यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अदनान शेख याच्या डोक्याला पिस्टल लावून जीवे ठार मारण्याची धममी देत अदनानकडील एमएच १२ केटी ४७९५ हे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अदनान शेख व प्रज्वल पालवे या दोघांकडून अधिक माहिती घेतली असता, वाहनात जीपीएस यंत्रणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जीपीएस यंत्रणेद्वारे वाहनाचा शोध घेतला असता हे वाहन सारोळा रोड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कठीण परिस्थितीतही सोनिया गांधी खंबीर, ऑक्सिजन मास्क घालून विमान प्रवास
अदनान शेखची गाडी घेणाऱ्या आरोपीकडे पिस्तुल असल्याने जामखेड पोलिसांनी अधिक कुमक मागवून आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांना हे वाहन सारोळा रोडवरील क्रिकेट मैदान परिसरात सापडले. मात्र आरोपी सापडले नाहीत.
जामखेड पोलिसांच्या पथकाने सदर आरोपीचा खर्डा रोड परिसरात शोध घेतला असता सदर आरोपी साई हॉटेलमध्ये पोलिसांना आढळून आले. यावेळी जामखेड पोलिसांनी सदर आरोपींना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता दोन अज्ञात आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांशी झटापट केली. आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार याने पोलिसांकडे पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पोलिस पथक आणि फिर्यादीच्या जीवाला धोका असल्याने पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी अधिकृत सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून 1 गोळी आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार याच्या पायात झाडली. यामध्ये आरोपी प्रताप पवार हा जखमी झाला. यानंतर पोलिसांनी तत्काळ सर्व आरोपींना अटक केली.
यानंतर जखमी आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार याच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी जामखेड पोलिसांनी १) प्रताप उर्फ बाळा हनुमंत पवार, वय-३० वर्षे, २) शुभम बाळासाहेब पवार, वय- २१ वर्षे, ३) काकासाहेब उत्तम डुचे, वय- २१ वर्षे, सर्व रा. सारोळा ता.जामखेड जिल्हा अहमदनगर यांचे विरुद्ध भा. द. वि कलम 307, 353, 332, 34 आणि भारतीय शस्त्र कायदा, 1959 च्या कलम 3/25 आणि 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा, बंदुक बाळगणे असे गंभीर गुन्हे आहेत.