अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे १५ दिवस अगोदर होळीचा सण यंदाही मोठ्या उत्साहात आणि नाथांच्या जयघोषात साजरा करण्यात आला आहे. नगारा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या जयघोषात कानीफनाथ गडावर होळी पेटली. १५ दिवस अगोदर होळीचा सण साजरा होणारे देशातले हे एकमेव गाव आहे.
नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पुजा करून मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड व पुजाऱ्यांच्या हस्ते बुधवारी रात्री नऊ वाजल्यांनंतर ही होळी पेटवण्यात आली. या होळीच्या सणाला स्थानिक बोली भाषेत भट्टीचा सण म्हणतात. सणासाठी लागणाऱ्या गोवऱ्या दहा दिवस अगोदरच कानीफनाथांचे नाव घेत महिलांनी तयार केल्या होत्या.
यावेळी घरोघरी तयार केलेल्या गोवऱ्या वाजत गाजत गडावर आणत सुर्यास्तापुर्वी ही होळी रचण्यात आली. होळी भोवती आकर्षक रांगोळी व फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती. भट्टी पेटल्यानंतर भाविकांनी प्रदक्षिणा घालून नाथांच्या भट्टीमध्ये नारळ अर्पण केले.
सव्वा लाखात लॉन्च झाली ही शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर
गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ग्रामस्थांकडून ठेवण्यात आला. सर्व समाजातील ग्रामस्थांना होळी रचण्याचा मान असून त्या स्वरूपात देवस्थान समितीकडून डाळ व गुळ दिला जातो. धगधगत्या होळीला प्रदक्षिणा घालून देवाला कौल लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी देवस्थानचे सचिव विमल मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे आदी उपस्थित होते.