Download App

तब्बल 46 एकरात भरणार देशातील सर्वात मोठा ‘महापशुधन एक्सपो’

अहमदनगर : देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३’ (Maha Pashudhan Expo) चे दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची शक्यता आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा ‘महापशुधन एक्स्पो’ शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी ठरणार आहे. अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी आज शिर्डी येथे दिली.

‘महापशुधन एक्सपो २०२३’ संदर्भात खासदार विखे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्धाटन २४ मार्च २०२३ रोजी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी ‌व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.

महिला आमदारांची विधानभवनात जोशात एंट्री..

खासदार विखे म्हणाले, शेतकऱ्यांची उपजिविका पशुधनावर अवलंबून असते. देशातील विविध राज्यातील शेतकरी आपली उत्पादकता वाढविण्यासाठी पशुधनाच्या कोणत्या प्रजातींचा वापर करते. त्यासाठी वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान या विषयांवर विचारांचे आदान-प्रदान व्हावे. चर्चा, परिसंवादातून मंथन घडावे. यासाठी या प्रदर्शनात देशपातळीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ पशुपालकांना होणार आहे.

विमानसेवा… पुणे – मुंबई प्रवास होणार अवघ्या तासाभराचा

या प्रदर्शनात जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी स्थानिक विद्यार्थ्यांनी तयार केलेले रामायण महानाट्य, २५ मार्च रोजी चला हवा येऊ द्या व २६ मार्च रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम होणार आहे. जनसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून प्रदर्शनात भेट देणाऱ्या राहाता व शिर्डी परिसरातील नागरिकांसाठी १०० बसेसच्या विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा नियोजनांच्या माध्यमातून या प्रदर्शनासाठी पशुसंवर्धन विभागास अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. असे खासदार विखे यांनी सांगितले.

Tags

follow us