Download App

पहिल्या अग्निवीरांचे अहमदनगरमध्ये प्रशिक्षण सुरू

अहमदनगर : भारतातील अग्निवीर जवानांच्या पहिल्या बॅचचे सैनिकी प्रशिक्षण अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलमध्ये (एसीसी अँड एस) सुरु झाले आहे. जवानांना येथे सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण मिळणार आहे. अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलच्या अंतर्गत औरंगाबाद रस्त्यावरील बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट आणि जामखेड रस्त्यावरील अमेमेंट इलेक्ट्रॉनिक रेजिमेंट या दोन विभागात हे प्रशिक्षण सुरू आहे. 

देशाच्या कानाकोपर्‍यातून दाखल झालेल्या सुमारे १८०० अग्निविरांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. अग्निवीर योजनेंतर्गत युवकांना भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळाली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती करण्यात आले आहे.

या केंद्रातून प्रशिक्षण घेणार्‍या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालविणारा गनर, तांत्रिक सहायक (टेक्निकल असिस्टंट), रेडिओ ऑपरेटर, मोटार ड्रायव्हर या चार महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावण्याची संधी मिळाली आहे. यासाठी मूलभूत शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण हे या केंद्रातील प्रशिक्षकांकडून दिले जात आहे.

त्यामध्ये 10 आठवड्यांचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण आणि २१ आठवड्यांच्या अ‍ॅडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे.
या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निविरांनी सांगितले की, अग्निवीरच्या माध्यमातून देशाची सेवा करण्याची संधी आम्हांला मिळाली आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहे.

या केंद्रातून देशाचा वीर म्हणून बाहेर पडणार आहोत. या प्रशिक्षणात टँकच्या वेगवेगळ्या भागांचे प्रशिक्षण आम्हांला दिले जात आहे. अग्निवीर होण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, असा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us