सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप (BJP) नेमका कोणाचा उमेदवार मैदानात असणार? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेल्या उदयनाराजे भोसले यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. अशात “आमच्या महाराजांना तिकीट मिळेल का? असा एका नंदीबैलाला प्रश्न विचारण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या प्रश्नावर नंदीबैलही होकारार्थी मान डोलावताना दिसत आहे. (Udayanaraje Bhosale’s name is being discussed by BJP in Satara Lok Sabha constituency.)
हा व्हिडीओ साताऱ्यातील नेमका कोणत्या गावातील आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र काही युवक या नंदीबैलाला पाहून आमच्या छत्रपती उदयनराजे भोसले यंना यंदा भाजपकडून तिकीट मिळेल का? असा सवाल बैलाला संबंधित मालकाला विचारायला सांगतात. तो मालकही त्या बैलाला हा प्रश्न विचारतो. त्यावर बैल होकारार्थी मान डोलवतो. त्यावर विजयी होईल का? असा दुसरा प्रश्न विचारतात. त्यावरही नंदीबैल होकारार्थी मान डोलवताना दिसत आहे. त्यामुळे नंदीबैलाची भविष्यवाणी खरी ठरताना दिसणार का? असा सवाल विचारला जात आहे. सध्या ट्विटर आणि इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
साताऱ्यातून आमच्या महाराजांना तिकीट मिळेल का? प्रश्न विचारताच नंदी बैलाना डोलावली मान…
.@Chh_Udayanraje pic.twitter.com/om1tNknJS4— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 19, 2024
भाजपने अजित पवार यांच्याशी युती केल्यानंतर जागावाटपात त्यांनी लोकसभेच्या चार जागा आधीच मागून घेतल्या आहेत. रायगड, बारामती, शिरूर आणि सातारा या चार जागांवर राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाव्यात, अशी अजित पवारांची ठाम मागणी आहे. आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे देखील याच मतदारसंघातून खासदार होते.
शिवसेनेने अनपेक्षितरित्या या मतदारसंघावर दावा केला. जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. जाधव यांनी या आधीच्या काही निवडणुकांत उदयनराजे यांना चांगली टक्कर दिली होती. महायुतीतील हे दोन पक्षच साताऱ्यासाठी आ्ग्रही असताना भाजपमधून उदयनराजे यांनीही आपल्याला निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला. उदयनराजे या आग्रहाला बळी पडले आणि त्यांनी अवघ्या सहा महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे राज्य विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यात शरद पवार यांचे वर्गमित्र आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना 60 हजारांच्या फरकाने धूळ चारली. आता हेच उदयनराजे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी इच्छुक आहेत.