पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे उद्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. भगीरथ भालके पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून कसे निवडून येतात तेच मी पाहतो तेच आम्ही बघतो, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंढरपूरमध्ये बोलत होते. (we-will-see-how-bhagirath-bhalke-is-elected-to-the-legislative-assembly-umesh-patil)
भगीरथ भालके हे उद्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.त्यामुळे पंढरपुरात राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भगीरथ भालकेंच्या बीआरएस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे . पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी भगीरथ भालकेवर निशाणा साधला. तसेच भालकेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता बीआरएसमध्ये जाणार नसल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.
भगीरथ भालके हे पदाच्या लालसेपोटी त्या पक्षात गेले आहे. परंतु ते आमदार होणार नाही याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट, राष्ट्रवादी जोमाने काम करेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातून आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच असेल असा विश्वास देखील यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरा साठे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर काखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ माळी, राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ, अनिता पवार, नागेश फाटे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.