Download App

Satyajeet Tambe : सत्यजित तांबेंना पाठिंबा का दिला? जिल्हाध्यक्ष साळुंखेंना कारणे दाखवा नोटीस

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केलेले उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्याने अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

प्रदेश काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलेला नसताना अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्यावतीने बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय. तांबेंना पाठिंबा देण्याबाबतची कारणे प्रदेश कमिटी कार्यालयाकडे पाठवा, असे आदेश प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले आहेत.

साळुंखेकडून पाठिंबा देण्यात आल्याच्या बातम्या अहमदनगरमधील वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झाल्याने पक्षाचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी नोटीस पाठवलीय. मोरेंनी पाठवलेल्या नोटीसीत म्हंटलं, आपण नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून आपल्याला कळविण्यात येते की, ही बातमी आपण प्रसिद्ध केली आहे की इतर कोणी? याचा खुलासा दोन दिवसांच्या आत प्रदेश कार्यालयाकडे लेखी स्वरुपात पाठवावा. दरम्यान, तांबे पिता-पुत्राने पक्षासोबत फसवेगिरी केल्याने नाशिक पदवीधरमधून अपक्ष उमेदवार असलेले सत्यजित तांबे यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात असल्याचं दिसून येतंय.

अद्याप काँग्रेसकडून नाशिक पदवीधरच्या जागेबाबत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसून महाविकास आघाडीची लवकरच भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हंटलंय. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने त्यांच्यासह सुधीर तांबे यांनी पक्षाशी फसवेगिरी आणि दगाफटका केल्याचं नाना पटोलेंनी म्हंटलं होतं.

महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट करण्याआधीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी तांबे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचं दिसून आलं. साळुंखे यांची अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे ते निकटवर्तीय देखील समजले जातात.

दरम्यान, एकीकडे साळुंखे यांनी तांबेंना पाठिंबा दिलाय तर दुसरीकडे काँग्रेसकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलीय. तांबे यांच्यासाठी ही निवडणूक अडचणीची ठरण्यासाठी काँग्रेसच्याकडून रोखठोक भूमिका घेतली जात असल्याचं दिसून येतंय. आता जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे आगामी काळात काँग्रेस प्रदेश कमिटीला काय उत्तर देणार? सत्यजित तांबेंना निवडणुकीत पाठिंबा देणार का? निवडणुकीत ते कोणाचं समर्थन करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट असून आता साळुंखे काय भूमिका घेतील याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलंय.

Tags

follow us