Woman Took Poison In Solapur : सोलापूर भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशमुख यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. याबाबतची तक्रार सोलापुरात पोलिसांत देत तरूणीने देशमुख यांच्या सांगोला तालुक्यातील जवळा गावात येऊन विष घेतले. दरम्यान पीडित तरुणीने विष घेण्यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह श्रीकांत देशमुख व त्यांचे दोन्ही भाऊ हे आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला.
याबाबत अधिक माहिती अशी, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखने गेल्या वर्षी मुंबईत ओशिवारा पोलीस ठाण्यात एका तरूणीविरोधात खंडणी मागितल्याची फिर्याद दाखल केली होती. परंतु नंतर संबंधित तरूणीने आपल्यावर श्रीकांत देशमुख यांनी लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद सोलापुरात दाखल केली.
तसेच सदर तरुणीचे देशमुख यांच्यासोबत एका बंद खोलीत असलेली व्हिडीओ क्लिप पीडित तरूणीने समाज माध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. त्यामुळे काही दिवसांतचा देशमुखला भाजप जिल्हाध्यक्षपदावरून प्रदेश पक्षश्रेष्ठींनी मुक्त केले होते. तथापि, पीडित तरूणीने श्रीकांत देशमुखसह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दाद मागूनही आपणांस न्याय दिला नाही. उलट त्रास दिल्याचा आरोप समाज माध्यमांद्वारे केला आहे.
या सगळ्याला कंटाळून तिने सांगोला तालुक्यातील जवळा गावात येऊन विषप्राशन केले. तत्पूर्वी तिने चित्रफित प्रसारीत करून आपणांवर झालेल्या अन्यायामुळे आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले होते. आपल्या आत्महत्येला भाजप नेते चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, श्रीकांत देशमुख व त्यांचे भाऊ जबाबदार असल्याचा आरोप केला होता. संबंधित तरुणीला शासकीय रूग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे.