मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही; फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना?

हा माझा पक्ष आहे आणि हे माझे कार्यालय आहे. यासाठीच मी भाजप शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येथे आलो होतो.

News Photo   2026 06 07T182520.769

मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही; फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना?

राज्यातील विधान परिषद निवडणुकीची (MLC) रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपच्या दोन नेत्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. यातच आता भाजपचे मालेगावचे बंडखोर नेते प्रसाद हिरे यांनी थेट भाजप कार्यालयात जात, मला माघार घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मंत्री गिरीश महाजन यांनी कोणतीही सूचना दिली नाही, असा धक्कादायक खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रसाद हिरे यांनी थेट भाजप कार्यालयात हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना हिरे म्हणाले, हा माझा पक्ष आहे आणि हे माझे कार्यालय आहे. यासाठीच मी भाजप शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येथे आलो होतो. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, माझा विजय नक्की आहे. तसंच, मी माघार घ्यावी यासाठी मला मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अन्य कोणीही अद्याप सूचना दिलेली नाही. मी गिरीश महाजन यांची भेट घेणार आहे, त्यानंतर ते जे काही आदेश देतील त्यावर पुढील योग्य तो निर्णय घेऊ.

छगन भुजबळ राज्यसभेवर जायला तयार, पण एका अटीवर.., भाजपकडून अद्याप ग्रीन सिग्नल नाही

दुसरीकडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीला मोठा हादरा बसला आहे. बंडखोरीचे हे वादळ शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांना अपयश आले आहे. सध्या हे दोन्ही नेते गोकुळ गीते यांची मनधरणी करून त्यांचा जाहीर पाठिंबा मिळवण्याची रणनीती आखत आहेत. मात्र, गोकुळ गीतेंनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत, जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेली आहे, अशा कडक शब्दांत महायुतीला सुनावलं आहे.

महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे गोकुळ गीते यांचे बंधू आणि भाजपचे नेते गणेश गीते यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत माघार घेतली. मात्र, गोकुळ गीते स्वतः रिंगणात कायम आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते आणि भाजपचे प्रसाद हिरे असा अटीतटीचा तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version