इस्रायलचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा; पुतळा उभारणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मागितली मदत
'शिवराज्याभिषेक दिना'चे औचित्य साधत इस्रायल सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj’s statue in Israel : अखंड भारताचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा डंका आता सातासमुद्रापार थेट इस्रायलमध्ये गाजणार आहे. 6 जून रोजी साजऱ्या झालेल्या ‘शिवराज्याभिषेक दिना’चे औचित्य साधत इस्रायल सरकारने आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूत (Consul General) यानिव रेवाच यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून यासंदर्भात माहिती दिली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडे तांत्रिक, कलात्मक आणि ऐतिहासिक सहकार्य मागितले आहे.
‘शिवराज्याभिषेक दिनी’ मुख्यमंत्र्यांना विशेष पत्र
या अधिकृत पत्रानुसार, 6 जून 2026 रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर हे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाला प्राप्त झाले आहे. या पत्रात इस्रायलचे महावाणिज्य दूत यानिव रेवाच यांनी नमूद केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. मुंबईत आल्यानंतर मी मराठा साम्राज्याचा इतिहास अभ्यासला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका साम्राज्याचे संस्थापक नव्हते, तर त्यांचे सुशासन, अफाट शौर्य, धार्मिक सहिष्णुता आणि आरमारी ताकद (Naval Strength) आजही जगभरातील पिढ्यांना प्रेरणा देणारी आहे.”
स्वयंपाकघराला महागाईची झळ; घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 29 रुपयांनी महाग, आजपासून नवे दर लागू
भारत-इस्रायल मैत्रीचा नवा अध्याय
इस्रायल दूतावासाने स्पष्ट केले आहे की, इस्रायलच्या भूमीवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारल्याने भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक आणि भावनिक संबंध अधिक घट्ट होतील. विशेषतः महाराष्ट्र आणि इस्रायलमधील ज्यू समाज (Indian Jewish Community) यांच्यात जुने ऐतिहासिक ऋणानुबंध आहेत. आज या समाजातील अनेक नागरिक इस्रायलच्या प्रगतीत मोठे योगदान देत आहेत. हा पुतळा दोन्ही संस्कृतींना जोडणारा एक भक्कम दुवा ठरेल.
महाराष्ट्र सरकारकडे ‘या’ गोष्टींसाठी मागितली मदत
हा प्रकल्प अत्यंत अचूक आणि भव्य व्हावा यासाठी इस्रायल सरकारने महाराष्ट्र सरकारकडे अधिकृतपणे मार्गदर्शनाची विनंती केली आहे:
1. ऐतिहासिक संदर्भ (Historical References): महाराजांच्या जीवनकाळातील अचूक संदर्भ मिळवण्यासाठी.
2. कलात्मक आणि डिझाईन सल्ला (Artistic & Design Consultation): पुतळ्याची भव्यता आणि शिवरायांची मुद्रा हुबेहूब साकारण्यासाठी तज्ज्ञांची मदत.
3. लोकांचा प्रकल्प (People’s Project): सुरुवातीला शासकीय स्तरावर सुरू होणारा हा प्रकल्प आगामी काळात दोन्ही देशांतील जनतेचा लोकप्रकल्प बनावा, अशी इस्रायलची इच्छा आहे.
अंबडचा वादग्रस्त तहसीलदार विजय चव्हाण याला 6 लाख 40 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण!
शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला आणि मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून आलेली ही बातमी प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावणारी आहे. जागतिक स्तरावर शिवरायांच्या युद्धनीतीचा आणि सुशासनाचा अभ्यास केला जातोच, मात्र आता थेट इस्रायलसारख्या सामरिकदृष्ट्या बलाढ्य देशात महाराजांचे स्मारक उभे राहणे हा महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा निर्णय मानला जात आहे.
या ऐतिहासिक प्रस्तावावर आता राज्य सरकार काय पावले उचलते आणि या पुतळ्याचे काम कधी सुरू होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.