अंबडचा वादग्रस्त तहसीलदार विजय चव्हाण याला 6 लाख 40 हजारांची लाच घेताना अटक

दरमहा ७ लाख रुपये मागितले होते, परंतु फिर्यादीने तहसीलदाराला ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे मान्य केले.

News Photo   2026 06 06T215405.176

जालना जिल्ह्यातील अंबड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Beed) अवैध वाळू वाहतूक आणि पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदाराचे पोकलेन मशीन आणि ६ हायवा ट्रकद्वारे अवैध वाहतूक सुरू होती. या वाहनांवर आणि पोकलेनवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता ती नियमित सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण याने तक्रारदाराकडे दरमहा तब्बल ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

नीट पेपरफुटीतील आरोपी कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर; बीड पालीकेची कारवाई

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने अंबड येथे सापळा रचला. दरमहा ७ लाख रुपये मागितले होते, परंतु फिर्यादीने तहसीलदाराला ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे मान्य केले. शनिवारी ठरलेली लाचेची रक्कम ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. तहसीलदार विजय चव्हाण याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून वाळू माफिया आणि महसूल विभागाचे आर्थिक लागेबांधे उघड झाले आहे. कारवाई न करण्यासाठी लाच घेणारे असे इतरही अधिकारी एसीबीच्या रडारवर आहे.

अब्दीमंडी येथील २५० एकर निर्वासित जमिनीच्या वादग्रस्त फेरफार आणि विक्री प्रकरणात २०२४ साली विजय चव्हाण याला शासनाने निलंबित केले होते. अब्दीमंडीच्या निर्वासित संपत्तीच्या फेरफाराची आणि नोंदणीची प्रक्रिया करताना गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत चव्हाण याला शासनाने निलंबित केले होते.

follow us