शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले?, प्रवक्त्या शितल म्हात्रेंनी दिली माहिती

20 नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांना मनपाचं कामकाज माहीत नाही. त्यामुळे, त्याच संदर्भाने आम्ही नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबिर घेतलं

News Photo   2026 01 18T153850.167

शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले?, प्रवक्त्या शितर म्हात्रेंनी दिली महत्वाची माहिती

राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत भाजप (BJP) शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, हे बहुमत काठवरचं असल्याने पुन्हा एकदा घोडेबाजार होणार की काय, नगरसेवकांची पळवापळव होणार की काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलं? याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर सुरू झालेल्या हॉटेल पॉलिटिक्सवर शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी माहिती दिली. आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. महायुती म्हणूनच सत्तेत येणार अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी बोलून दाखवली. तसेच, नगरसेवकांना हॉटेलवर ठेवण्यात आल्यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली.

मी त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार, संजय राऊतांच्या एका वाक्याने शिंदेंच्या गोटात प्रचंड खळबळ

आमचे जवळपास 20 नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांना मनपाचं कामकाज माहीत नाही. त्यामुळे, त्याच संदर्भाने आम्ही नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबिर घेतलं आहे, त्यासाठी हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. हे उबाठाच्या नगरसेवकांना हरवून आलेत, असेही शीतल म्हात्रे यांनी सांगितले. महायुती ही बाळासाहेब यांनी केलेली नैसर्गिक युती आहे, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा विषय नाही. तसेच, महापौर पदाचा निर्णय महायुतीचे नेते घेतील, असेही म्हात्रे यांनी म्हटलं. तसंच, भाजपचे 89 नगरसेवक निवडून आल्याने त्यांना 114 हा मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे.

हीच गरज ओळखून एकनाथ शिंदे यांच्याकडून अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाची समान वाटणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात करावी. त्याचबरबोर स्थायी समिती व इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बीएमसीतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजय राऊत नाश्त्याला हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये जाणार आहेत, यासंदर्भात शितल म्हात्रेंना विचारले असता, त्यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली. संजय राऊत म्हणजे चाकरी सिल्व्हर ओकची आणि भाकरी मातोश्रीची असं आहे. सगळ्यांना खड्ड्यात घातलं, खासदारकी संपत आली आहे. तीही शिंदेंच्या कृपेमुळे आली होती. नगरसेवकांना मस्का मारायला येणार असतील की मला शिंदेंकडे घेऊन चला, असा टोला शितल म्हात्रेंनी लगावला.

Exit mobile version