करुणा शर्मा. चार वर्षांपूर्वीपर्यंत हे नाव परळी आणि बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चेत होते. पण आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आहे. जेव्हा जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संबंधित एखादा वादग्रस्त विषय चर्चेत येतो तेव्हा करूणा शर्मा मुंडे हे नाव आपसुकच येते. आताही बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली आहे. वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू व्यक्ती. त्यामुळे कराडला मुंडे यांचाच आशीर्वाद असणार या दाव्यातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
अशात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याशी संबंधित एका प्रकरणाचा उल्लेख केला आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल ठेवून त्यांना अडचणीत आणणार अधिकारी कोण हे मला माहिती आहे, असा गौप्यस्फोट धस यांनी केला आहे. त्यामुळे संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या, भगीरथ बियाणी संशयास्पद आत्महत्या या प्रकरणानंतर करूणा शर्मांचेही प्रकरण चर्चेत आले आहे. (What exactly is the case of a pistol found in Karuna Sharma’s car)
12 जानेवारी 2021. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. तसंच ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. या तक्रारीनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. अशात धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत करूणा शर्मा यांच्याशी असलेल्या संबंधांना जगजाहीर केले.
“2003 पासूनच परस्पर सहमतीने संबंध असल्याची आणि दोन मुले असल्याची कबुली मुंडेंनी दिली. रेणू शर्मा या करुणा शर्मा यांची बहीण होय. मुंडेंच्या या कबुलीनंतर रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली होती. पण महिन्याभरानंतर पुन्हा एकदा करुणा शर्मा यांनी त्यांच्या मुलांना बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे दोन महिने मुंडे-शर्मा संबंधांचे प्रकरण चांगलेच गाजले होते.
या घटनेच्या आठ महिन्यांनंतर करुणा शर्मा यांनी 5 सप्टेंबर 2021 मध्ये परळी दौरा केला होता. या दौऱ्यात त्या वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी आल्या. दर्शन घेऊन परत जात असताना त्यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्तुल आढळून आली होती.
यानंतर पोलिसांनी त्यांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला, असा आरोप शर्मा यांनी केला होता. पण त्या घटनेनंतर काही वेळातच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. करुणा शर्मा वैद्यनाथ मंदिरासमोरून परत जात असताना गाडीजवळ एक महिला आली होती. त्या महिलेने तोंड पूर्णपणे बांधले होते. ती महिला गाडीची डिकी उघडून त्यात काहीतरी वस्तू ठेवत असल्याचे या व्हिडीओतून दिसून आले होते. पण, पिस्तूल कोणी ठेवले की अगोदपासूनच होते याचे गूढ आजपर्यंत कायम होते.
अशात साडे तीन वर्षांनंतर सुरेश धस यांनी या प्रकरणावरची खपली पुन्हा काढली आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल टाकणारी बुरखाधारी व्यक्ती महिला पुरूष होता. तसेच संबंधित व्यक्ती पोलीस खात्यातीतलच होता. सुरुवातीला धस या पोलीस अधिकाऱ्याचे नाव जिल्हा पोलीस अधिक्षकांनाच सांगणार असे म्हणत होते. मात्र त्या पोलिसाचे नाव संजय सानप आहे, असा गौप्यस्फोटच सुरेश धस यांनी काही दिवसातच जाहीर सभेतून केला. धस यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू आहे. खरंच पिस्तूल अगोदपासूनच होते? त्या बुरखाधारी महिलेनेच ठेवले का? ती बुरखाधारी महिला म्हणजे संजय सानपच होते का? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.