मुंडेंना नडणाऱ्या धसांना अजितदादांचा धक्का; आमदार असूनही नियोजन समितीतून डच्चू

मुंडेंना नडणाऱ्या धसांना अजितदादांचा धक्का; आमदार असूनही नियोजन समितीतून डच्चू

Ajit Pawar : बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके ही आमदारद्वयी अजित पवारांच्या रडारवर आली आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या एक दिवस आधीच शासनाने नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली. मात्र धनंजय मुंडे यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार सुरेश धस यांना सरकारकडूनच धक्का देण्यात आला.

खबरदार, कुणी खंडणी मागितली तर.. बीडमध्ये दाखल होताच अजितदादांनी ठणकावलं!

राज्य सरकारच्या या आदेशात बीड जिल्हा नियोजन समितीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित, भाजप आमदार नमिता मुंदडा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांना मात्र डावलण्यात आले आहे. आता धस आमदार असतानाही नियोजन समितीत त्यांना स्थान मिळालं नाही याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आरोपांचा धुरळा उडवून दिला. यातच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही लावून धरली होती. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मुंडेंना चांगलंच धारेवर धरलं होतं. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा सुरेश धस यांच्याबाबत  अजित पवार यांना काही विचारायचे त्यावेळी उत्तर देताना अजित पवार यांच्या आवाजात संताप स्पष्ट जाणवत होता. सुरेश धस काय बोलतात याचं मला काहीच देणंघेणं नाही असे अजित पवार म्हणाले होते.

Video : धनंजय मुंडे दिल्लीत, धसांनी बाहेर काढला ७३ कोटींचा घोटाळा

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह विरोधकांनी दबाव वाढवला आहे. आता धस यांनी नव्यानं त्यांनी काही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करत मुंडेंनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला. धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना ७३ कोटी ३६ लाख रुपयांची काम न करता बोगस बिलं उचलली, असा आरोप आमदार धस यांनी केला. अजित पवार यांच्या बैठकीआधीच सुरेश धस यांनी काल पत्रकार परिषद घेत हे आरोप केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube