When will the Mahesh Pilankar case be solved? : कोल्हापूरमधील पाटगाव (ता. भुदरगड) येथील माजी सरपंच दिनकर पिळणकर हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून या प्रकरणाचा तपास अद्यापही अनिश्चितेत आहे. त्यांच्या बेपत्ता होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने कुटुंबियांसह ग्रामस्थ्यांमध्ये चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या वाहनाचा शोध लागणे आणि त्याच परिसरात जळालेल्या अवस्थेत काही अस्थी सापडल्याने या प्रकरणाने अधिकच गूढ स्वरूप धारण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटगाव गावालगत कुलकर्णी यांच्या शेताजवळ पिळणकर यांचे वाहन काही दिवसांपूर्वी आढळून आले होते. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. वाहन सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत काही मानवी अस्थी देखील आढळून आल्या. या अस्थी नेमक्या कोणाच्या आहेत याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नसून त्या अधिक तपासासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्या आहेत. मात्र या तपासाचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढलं आहे.
पिळणकर हे पाटगावचे माजी सरपंच असल्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याची घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. भुदरगड पोलिसांनी तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले. परिसरातील शेतजमिनी, जंगलभाग आणि आसपासच्या ठिकाणी शोधमोहीम देखील राबवण्यात आली. मात्र या सर्व प्रयत्नांनंतरही अद्याप पिळणकर यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
या पार्श्वभूमीवर पिळणकर कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता वाढली असून त्यांनी तपासाची गती वाढवण्याची मागणी केली आहे. सोमवारी (दि. 9) लोकशाही आणि संविधान हक्क संरक्षण समिती तसेच पिळणकर कुटुंबियांनी दसरा चौक येथे निदर्शने करत पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत या प्रकरणाचा सखोल आणि जलदगतीने तपास करण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील ‘म्युझिकल रोड’ वादाच्या भोवऱ्यात; रहिवाशांचा आवाजामुळे त्रास होत असल्याचा आरोप
निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी केली. तसेच सापडलेल्या अस्थींची डीएनए आणि फॉरेन्सिक तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली. कुटुंबियांच्या मते, या अस्थींचा अहवाल लवकर मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण त्या अस्थींचा पिळणकर यांच्याशी काही संबंध आहे का, याबाबत यावरून स्पष्टता येऊ शकते.
दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या पथकाकडून विविध शक्यता तपासल्या जात असून पिळणकर यांच्या संपर्कातील व्यक्ती, मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी पिळणकर कुटुंबियांना दिले. तसेच तपासामध्ये कोणताही कसूर ठेवला जाणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात असून काही नागरिकांनी या प्रकरणाची तुलना बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणाशी केली आहे. त्यामुळे या घटनेचा तपास अधिक पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने व्हावा, अशी मागणी देखील स्थानिकांकडून केली जात आहे. पिळणकर यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण काय, सापडलेल्या अस्थी कोणाच्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमके काय घडले, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तापसातूनच या गूढाचा उलगडा होणार असल्याने पिळणकर कुटुंबीय आणि ग्रामस्थ्य पोलिसांच्या पुढील कारवाईकडे अपेक्षेने पाहत आहेत.
