कोल्हापुरात गर्भलिंग निदान रॅकेटचा भांडाफोड; माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रंगेहात जाळ्यात
माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांना बेकायदेशीर गर्भपाताची तयारी करत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले.
Fetal sex determination racket busted : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कदमवाडी रोडवरील प्रतिमा हॉस्पिटलचे संचालक तथा माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांना बेकायदेशीर गर्भपाताची तयारी करत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून, अनेक महत्वाच्या शासकीय पदांवर काम केलेल्या डॉक्टरचे नाव या प्रकरणात समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डॉ. चंद्रकांत गायकवाड यांनी पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि बीड येथे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम केले आहे. तसेच मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात अतिरिक्त अधीक्षक आणि पुण्यात सहाय्यक संचालक म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधातील कारवाई अधिकच चर्चेचा विषय ठरली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठीची औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे.
प्राथमिक चौकशीत डॉ. गायकवाड यांनी आतापर्यंत सुमारे 200 ते 250 बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती समीर आल्याचे सांगितले जात आहे. अटकेला प्रक्रिया सुरू असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा 26 जुलै रोजी झालेल्या एका कारवाईतून झाला. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने कळंबा येथील एका लॉजवर छापा टाकून अवैध गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी स्वप्नील केरबा पाटील याला अटक केली होती.
देशावर दुहेरी हवामान संकट; पुढील 96 तास मुसळधार पाऊस महाराष्ट्रासह अनेक राज्यांत फ्लॅश फ्लडचा इशारा
त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अश्विनी गजानन शिंदे हिच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली. स्वप्नील पाटीलकडून गर्भलिंग तपासणी करून घेतल्यानंतर ज्या महिलांच्या पोटात मुलगी असल्याचे निष्पन्न होत असे, त्या महिलांना पुढील गर्भपातासाठी कदमवाडी रोडवरील ‘प्रतिमा हॉस्पिटल’मध्ये पाठवले जात असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तेथे डॉ. चंद्रकांत गायकवाड बेकायदेशीररीत्या गर्भपात करत असल्याचा खुलासा चौकशीत झाला.
मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पंचायत समिती करवीरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सापळा रचला. पोलिसांनी एक डमी रुग्ण प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पाठवला. चौकशीनुसार, डॉ. गायकवाड यांनी कोणताही अधिकृत केसपेपर किंवा नोंद न करता संबंधित महिलेला थेट दाखल करून घेतले. त्यानंतर स्वतःजवळील पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भाची तपासणी केली आणि गर्भपातासाठी औषधे देण्याची तयारी सुरू केली. याचवेळी बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्काळ छापा टाकून डॉ. गायकवाड यांना रंगेहात ताब्यात घेतले.
या कारवाईत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. गर्भलिंग निदानासाठी महिलांना कोण पाठवत होते, आर्थिक व्यवहार कसे होत होते आणि या बेकायदेशीर साखळीमध्ये इतर डॉक्टर किंवा मध्यस्थ सहभागी होते का, याबाबतही चौकशी सुरू आहे. अवैध गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.