Download App

महायुतीची कर्जत जामखेडची उमेदवारी ठरविण्याचा अधिकार रोहित पवारांना कोणी दिला? राम शिंदेंच्या शिलेदाराचा सवाल

Rohit Pawar : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दुसऱ्याना अनाहूत सल्ले देण्यापूर्वी स्वतःच्या घरात थोडे झाकून पहावे आणि आत्म परिक्षण

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दुसऱ्याना अनाहूत सल्ले देण्यापूर्वी स्वतःच्या घरात थोडे झाकून पहावे आणि आत्म परिक्षण करावे. जनतेच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी जनतेला जाहीररीत्या देण्याची हिम्मत कधीतरी दाखवावी. महाआघाडीतील (MVA) तुमचा मित्र पक्ष कॉग्रेस व शिवसेना उबाठा यांना या जागेवर दावा का ठोकवासा वाटला? तुमच्या पक्षाच्या जि.प. अहमदनगरचे माजी अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मनिषा गुंड तसेच सदस्य, पंचायत समिती कर्जत राजेंद्र गुंड यांनी तुमच्या पक्षापासून फारकत घेऊन वेगळी चूल का मांडली ? कर्जतचे रहिवाशी असलेले तुमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके तुमच्या राजकीय संघटनेच्या कार्यक्रमात नेहमीच दुर्लक्षित का असतात? तुमच्याच पक्षाचे जामखेडचे माजी जि.प.सदस्य मधुआबा राळेभात जाहीर कार्यक्रमातून तुमच्या बरोबर उपस्थिती का टाळतात? माजी जि.प.सदस्य मिरजगाव गट परमविर पांडुळे यांनी बिनशर्त भाजपमध्ये प्रवेश करून तुमच्यापासून फारकत का घेतली?

माजी सभापती नाना निकत आणि त्यांच्या टिमचा तुमच्याशी दुरावा का वाढला? शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत या संघटनेचे दोन वर्षापासून अध्यक्षपद रिक्त का आहे? कर्जत मधील ज्यांनी तुमची राजकीय कारकीर्द घडविली त्या सगळ्या मित्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सुपारीबाज म्हणत जागोजागी निनावी फलक लावण्याची पुणेरी संस्कृती इथे कोण रुजवू पहात आहे? अशा राजकीय प्रश्नांची उत्तरे रोहित पवार कर्जत जामखेड मधील जनतेला कधी देणार? तुम्हाला कर्जत जामखेडची महायुतीची उमेदवारी जाहीर करण्याचा नैतिक अधिकार आहे का? महायुतीची उमेदवारी जाहीर करण्याचा ज्यांना अधिकार आहे त्या महायुतीचे शिल्पकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी जाहीर सभेत राम शिंदे यांचे नाव जाहीर केले आहे.

त्यामुळे तुम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या नावाची काळजी करू नका. स्वतःच्या ताटात काय वाढवून ठेवले आहे ते पहा असे प्रश्न उपस्थित करत शेखर खरमरे तालुकाध्यक्ष भाजप कर्जत यांनी आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

कर्जत जामखेडमध्ये महायुतीकडून कोण उमेदवारी करणार? यावर भाष्य करणारे रोहीत पवार स्वतःच्या मित्र पक्षामधील खदखदणाऱ्या असंतोषावर मात्र जाणीव पूर्वक मूग गिळून गप्प आहेत . मित्र पक्ष कॉंग्रेसने त्यांच्या कार्य पद्धतीवर आक्षेप नोंदवत येथील उमेदवारीवर दावा ठोकलेला आहे. कर्जत जामखेडची जागा काँग्रेसची आहे आणि ती कॉग्रेसला मिळावी त्यासाठी मागील काळातील कॉग्रेसला मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करत आम्ही ही जागा लढवणारच आहोत अशी ठाम भूमिका घेत या जांगवर दावा ठोकतानाच  रोहीत पवार यांनी बारामतीतून उमेदवारी करावी. असा जाहीर सल्लाही कर्जत जामखेड कॉंग्रेसने संयुक्त बैठक घेऊन त्यांना प्रसार माध्यमांतून एकदा नव्हे तर दोनदा दिला आहे.

शिवसेना उबाठा गट यांनी बैठक घेऊन प्रसिद्धी माध्यमांसमोर रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर आक्षेप नोंदवत उमेदवारीचे संकेत दिले आहेत. मित्रपक्षांना कधीही विश्वासात घेतले नाही असे पत्रक काढून जाहिररित्या असंतोषाला वाचा फोडली आहे. कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर आजतागायत कर्जत मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार संघटनेचा अध्यक्ष रोहित पवारांना ठरवता आलेला नाही एवढे अविश्वासाचे वातावरण संघटनेच्या पातळीवर आहे . हे सर्व तुमच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना तुम्ही या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला देण्याची गरज असताना मात्र महायुतीच्या उमेदवारीची उठाठेव करण्याचे आमदार पवार यांना कारण काय? रोहित पवार यांनी त्यांच्या मित्र पक्षाच्या आणि त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिम्मत दाखवावी. संघटना पातळीवरील सावळा गोधळ व तेथे निर्माण झालेल्या त्यांच्या प्रश्नाला प्राथमिकता द्यावी. महायुतीला उमेदवारीबाबतचे अनाहुत सल्ले देऊन नयेत.

रोहित पवार यांना मतदारसंघातील वस्तुस्थितीची जाणीव झालेली दिसत आहे . मविआ काळात जनतेचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, इव्हेन्ट कंपनीच्या मार्गदर्शनाने तकलादू विकास संकल्पना, शाश्वत विकासापासून दूर आणि फक्त झगमगाट, जनतेचे मूलभूत प्रश्नांना समजून न घेता वडा पाव खाणे, केस कापणे, भित्तीचित्रे, महिलांना खेळ पैठणीचा कार्यक्रमातून वाटण्यात आलेल्या खोटया नथीचे वास्तव समोर आले आहे याद्वारे महिलांचीही फसवणूक झालेली आहे. फक्त प्रसिद्धी पूरक गोष्टी करण्यातच धन्यता मानत आहात. शाश्वत विकासा पासून तुम्ही कोसो दूर आहात.

मागील पाच वर्षात दिलेले एकही अश्वासन पूर्ण करता आलेले नाही किंवा कोणतेही क्षेत्रात संपूर्ण मतदार संघाला कलाटणी देणारा निर्णय किंवा असा प्रकल्प आणण्यात आलेले अपयश, सॉफ्ट टार्गेट म्हणून युवकांच्या मतांवर डोळा ठेऊन मंजूर नसलेली एमआयडीसी मंजूर म्हणत मतदारसंघात केलेला खोटा प्रचार त्यांनीच एमआयडीसीसाठी आंदोलन करून तो मंजुरीचा दावा खोटाच होता याला बळकटीच दिली. ते एमआयडीसी मंजुरीचा खोटा डाव अंगलट आल्याने त्यांना फार जिव्हारी लागलेले आहे . सरंजामशाही वृत्ती असल्यामुळे माझाच माइक आणि माझेच ऐक अशा प्रकारचे वर्तन, कार्यकर्त्याना विश्वासात न घेता गुलामा प्रमाणे वागणूक, खुनशी राजकारण, वैचारिक राजकारणाचा अभाव, मित्र पक्षांना गृहित धरणे त्यातूनच मग स्वपक्षीय व मित्र पक्षातीत शिलेदार दुरावले आहेत.

यामुळे आमदार पवार यांच्या पायाखालील वाळू सरकलेली आहे जनतेमध्ये असंतोष आहे. त्यांच्या भ्रामक अश्वासनांना लोकं आता बळी पडणार नाहीत .त्यामुळे त्यांनी आता हा असंतोष मतदारसंघात अजित पवार उभे राहणार? असे संभ्रम निर्माण करणारे भाकित जाणिवपूर्वक करत आहेत कारण मागील निवडणुकीवेळी दिलेल कोणतेही अश्वासन पूर्तता त्यांच्याकडून झालेली नाही. मतदार संघातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणेत मागील पाच वर्षांत ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत अशी जनतेत चर्चा होत आहे. या चर्चेमधून त्यांचे स्वतःचे अपयश अधोरेखित होत आहे. ते झाकण्यासाठी नविन मुद्दा उपस्थित करून त्या अनुषंगाने चर्चा घडविण्याचा त्यांचा डाव आहे परंतु त्यांनी कितीही युक्त्या लढवू द्या जनता दूधखुळी राहिलेली नाही . त्यांना जनतेने पूर्णपणे ओळखले आहे. राजकीय आणि विकासात्मक निर्माण झालेले प्रश्न यांची उत्तरे रोहित पवार यांनी जाहीररीत्या प्रथम जनतेला द्यावीत. त्यांच्यामध्ये अशा प्रश्नाची उत्तरे देण्याची हिम्मत आहे काय? असेल तर प्रथम त्यांनी जाहीर व्यासपीठावरून याची उत्तरे द्यावीत.

रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीचे मतदार संघात असे वाभाडे निघत असताना महायुतीच्या उमेदवारीबाबतचे भाष्य करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही . कर्जत जामखेडच्या उमेदवारी संदर्भात दिशाभूल करणारे दावे त्यानंतर विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये स्पॉन्सर्ड किवा पेड न्यूज देऊन त्याविषयी वारंवार चर्चा घडवून आणणे आणि त्याद्वारे एक नरेटिव्ह सेट करून मतदारांच्या मानसिकतेशी खेळ करणे त्यांना संभ्रमित करणे असा त्यामागे डाव आहे. असं देखील यावेळी शेखर खरमरे म्हणाले. अशा क्लृप्त्या ते नेहमीच करत असतात त्याचा प्रत्यय मतदार संघातील जनतेला नेहमीच आलेला आहे.

रोहित पवार यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे हे लक्षण आहे त्यामुळे उमेदवारी संदर्भात नरेटिव्ह सेट करून अपयश झाकण्याचा त्यांचा प्रयत्न यावेळी स्वाभिमानी कर्जत जामखेड कर ओळखून आहेत. महायुतीच्या उमेदवारीची काळजी रोहित पवार यांनी करू नये. महायुतीचे नेते त्याबाबत सक्षम आहेत. मतदारसंघात भाजप संघटनात्मक दृष्टया प्रबळ आहे. महायुतीमध्ये समन्वय आहे.

मोठी बातमी! अहमदनगर शहरात उड्डाणपुलावर ट्रक उलटला

उमेदवारीबाबत महायुतीमध्ये कोणताही संभ्रम नाही. तुम्ही तुमचे मतदार संघातील मित्रपक्ष यांच्या दाव्याबाबत स्पष्टता करावी विनाकारण महायुतीचे अनिधिकृत प्रवक्ता बनू नये. असा खोचक सल्ला देत मतदारसंघातील वस्तुस्थिती दर्शवत रोखठोक मत भाजप तालुकाध्यक्ष यांनी मांडले आहे.

follow us