Download App

विधानसभेला बंडखोरी केलेले दादाराव कोचे कोण?, चार्टर्ड प्लेनने झालेल्या दिल्लीवारीत काय ठरलं होतं?

केचे यांनी २००४मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली. यात त्यांचा पराभव झाला. २००९मध्ये परत त्यांनी निवडणूक लढवित

  • Written By: Last Updated:

Dadarao Keche Legislative Council Candidate : आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष दंड थोपटले होते. प्रदेशाध्यक्षांनी चार्टर्ड विमानाने थेट (Keche ) दिल्लीला घेऊन जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घालून दिली. या भेटीत केचे यांना विधान परिषदेत उमेदवारीचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. भाजपचे उमेदवार सुमित वानखडे यांना बळ देऊन त्यांचा विजय निश्चित केला. शहा यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती रविवारी भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारीतून केल्याची चर्चा आहे.

कोण आहेत दादाराव केचे?

आष्टी तालुक्यातील अंबिकापूरमध्ये ५ एप्रिल १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला. गावाजवळील बेलवाडीत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी केचे यांनी आष्टी गाठले. आष्टी शहीद येथील हुतात्मा विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर आर्वी येथील कला व वाणिज्य विद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षणप्रवास केला. सोबतच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण करून इन्स्टिट्यूट सुरू केली. हे करीत असताना केचे आणि त्यांच्या पत्नीला आर्वी नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा सहकाऱ्यांनी आग्रह धरला. १९९०मध्ये दोघांनीही निवडणूक लढवून विजय मिळविला. १९९५मध्येदेखील नगरसेवक झाले.

मोठी बातमी! विधान परिषदेसाठी चंद्रकांत रघूवंशी शिवसेनेचे उमेदवार

केचे यांनी २००४मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली. यात त्यांचा पराभव झाला. २००९मध्ये परत त्यांनी निवडणूक लढवित काँग्रेसच्या अमर काळे यांचा पराभव केला. २०१४च्या निवडणुकीत केचे यांचा पराभव झाला. २०१९मध्ये भाजपने परत केचे यांच्यावर विश्वास दाखविला. हा विश्वास सार्थ करीत त्यांनी विजय मिळविला. विद्यमान आमदार असल्याने आपल्याला उमेदवारी मिळणार या आशेने त्यांनी मोर्चेबांधणी केली. पण, पक्षाने देवेंद्र फडणवीस यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली. यावरून नाराज झालेल्या केचे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

अमित शहांचा शब्द

भाजपने सावध पवित्रा घेत त्यांची मनधरणी केली. तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चेसाठी नेण्यात आले. त्यांना विधान परिषदेत संधी दिली जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले. यानंतर केचे यांनी पत्रपरिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. शहा यांनी केचे यांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा यानिमित्ताने आहे. विशेष म्हणजे, केचे यांनी राजकीय संन्यास जाहीर करून नंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मागेही घेतला होता.

follow us