सहर शेख यांना वादग्रस्त भाषण प्रकरणी लेखी वॉर्निंग; मुंब्रा पोलिसांची कारवाई

सहर शेख यांनी पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर केला. लेखी स्पष्टीकरण पोलिसांनी तक्रारदार किरीट सोमय्या यांनाही दाखवले असल्याची माहिती.

Untitled Design (309)

Untitled Design (309)

Written warning issued to Sahar Sheikh in controversial warning case : मुंब्रामध्ये केलेल्या एका वादग्रस्त भाषणावर आक्षेप घेतल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना लेखी स्वरूपात वॉर्निंग दिली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात परवा मुंब्रा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले होते. या तक्रारीनंतर सहर शेख यांना दोन वेळा मुंब्रा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान सहर शेख यांनी पोलिसांकडे लेखी माफीनामा तसेच स्पष्टीकरणात्मक स्टेटमेंट सादर केले. हे लेखी स्पष्टीकरण पोलिसांनी तक्रारदार किरीट सोमय्या यांनाही दाखवले असल्याची माहिती आहे.

मुंब्रामधील वादग्रस्त भाषण प्रकरणात सहर शेख यांना मुंब्रा पोलिसांकडून लेखी वॉर्निंग देण्यात आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी सांगितले की, सहर शेख या तरुण असल्यामुळे त्यांनी दिलेला लेखी माफीनामा स्वीकारण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाच्या निमित्ताने त्यांनी एमआयएम पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या म्हणाले, “एमआयएमचे नेते पुढील पिढीला कट्टरपंथाकडे वळवत आहेत, ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे. एमआयएम म्हणजे नवी मुस्लिम लीग असून, ते मुस्लिम समाजाला भडकवण्याचे काम करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रगीताप्रमाणे वंदे मातरमसाठी देखील उभं रहावं लागणार; लवकरच येणार नियम

यावेळी त्यांनी विविध भागांचा उल्लेख करत सांगितले की, “मालेगाव हिरवे केले, मानखुर्द हिरवे केले, मुंब्रा हिरवे केले आणि आता मुंबई हिरवी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न आम्हाला मान्य नाही,” असेही ते म्हणाले. सहर शेख यांच्याबाबत बोलताना किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले की, “सहर शेख या अवघ्या २२ वर्षांच्या तरुणी आहेत. त्यांनी माफी मागितली असून आम्ही त्यांचा माफीनामा स्वीकारला आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी पुढे आरोप करत म्हटले की, “हे मुस्लिम कट्टरपंथी नेते बाहेरून मदत घेऊन नव्या पिढीला बरबाद करण्याचे काम करत आहेत आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा दावा त्यांनी केला.

भाजपच्या भूमिकेबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, “भारतीय जनता पार्टी जिथे सत्तेत आहे, तिथे कुठलाही भेदभाव केला जात नाही. ‘लाडकी बहीण’ योजना ही हिंदू असो वा मुस्लिम सर्व बहिणींसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांमध्ये कुठलाही भेदभाव नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुढील काही वर्षांत मुंबईला मुस्लिम बनवण्याचा डाव असल्याचा आरोप करत, “याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकार ठामपणे मैदानात उतरले आहे,” असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना भारतीय न्याय संहिता कलम 168 अंतर्गत नोटीस बजावून लेखी वॉर्निंग दिली असून, भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये होऊ नयेत, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली असून, भविष्यात कोणत्याही प्रकारे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

Exit mobile version