ठाणे : तुम्ही राजीनामा द्या, मी तुमचं स्वागत करणार असल्याचा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के(Naresh Maske) यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) दिला आहे. आदित्य ठाकरेंचं राजकीय खेळीसाठी राजीनाम्याचं नाटक सुरु असल्याची घणाघात टीकाही त्यांनी यावेळी केलीय. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात आलीय.
आदित्य ठाकरेंना राजीनामा देण्यासापासून कोणीही अडवलेलं नाही. उध्दव ठाकरेंनंतर आता पुत्राकडूनही राजीनाम्याची सुरु आहे. राजकीय खेळासाठी त्यांचं राजीनाम्याचं नाटक सुरु असल्याची टीका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नरेश मस्के यांनी केलीय.
तसेच साधे 5 नगरसेवक ठाकरे गटाकडे थांबले नसून चारशे पाचशे रुपये देऊन माणसांना मिटिंगला बोलवावं लागत असल्याचंही ते म्हणाले आहेत. सध्या ठाकरे गटाचा पोरखेळ सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
राज्यभरातून शिवसैनिक शिंदे गटात दाखल होत असून नाशिकच्या लोकांनी मंदिराचा पाया शिवसेनेसाठी रचला त्याच लोकांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटात घराणेशाही सुरू असून ही शोकांतिका आहे म्हणूनच कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
आदित्य ठाकरे तुम्ही आधी जिथे राहतात तिथून निवडणूक लढवावी, नंतर त्यांनी बोलावे. तुम्ही बांद्रा मतदारसंघातून का निवडणूक लढवली नाही? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तुम्ही राजीनामा द्या, मी तुमचं स्वागत करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना दिलाय.
दरम्यान, मी राजीनामा देतो. तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी ताकद लावायची ती लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं होतं. त्यांच्या आव्हानानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्केंनी टीकेची तोफ डागली आहे.