Download App

‘तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले, आता जोमाने तयारीला लागा’ – शरद पवार

  • Written By: Last Updated:

मुंबई : मागील काही दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात होते. नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली. दरम्यान यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा, असा वडीलकीचा सल्ला शरद पवार (Sharad Pawar) यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

एमपीएससी परीक्षेसाठी नवीन पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले होते. त्यांची शरद पवार यांनी मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजता भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता. त्यानंतर एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली.

Kasba By Election : अक्षय गोडसे यांनी घातला गोंधळ, आधी धंगेकरांना नंतर रासने यांना पाठिंबा

या निर्णयानंतर शरद पवार यांनी ट्विट करुन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

 

Tags

follow us