झेडपी व पंचायत समिती निवडणुकीची प्रचार सांगता; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून निर्देश जारी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपणार असून, त्यानंतर प्रचार करता येणार नाही.
Campaigning for ZP and Panchayat Samiti elections concludes : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्रचाराबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपणार असून, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही. तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्याही स्वरूपातील प्रचार जाहिरातींवर पूर्ण बंदी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यात 7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील कलम 28 ब (1) नुसार मतदानास सुरुवात होण्याच्या आधीच्या 24 तासांत तसेच मतदानाच्या दिवशी कोणतीही सार्वजनिक सभा, प्रचारफेरी किंवा जाहीर प्रचार करता येणार नाही. यामध्ये प्रचारसभा, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रचाराचा समावेश आहे.
‘SIR’ म्हणजे लोकांना संपवण्याचं धोरण; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात कडाडल्या
राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, 2025’ नुसार, प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच समाजमाध्यमांमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रचारात्मक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर उमेदवार किंवा पक्षांच्या जाहिराती देण्यास मनाई राहणार आहे.
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगत, सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, माध्यम संस्था आणि नागरिकांनी निवडणूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
