पुणे : हिंदू-मुस्लिम वादातून पुण्यातील मोहसीन शेख (Mohsin Shaikh) या तरुणाच्या हत्याप्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांच्यासह २० आरोपींची पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आय टी अभियंता असलेल्या मोहसीनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाईसह २३ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
सोशल साईटवरील काही आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात २०१४ साली तणाव निर्माण झालेला होता. या वातावरणात २ जून २०१४ ला हडपसर भागात मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. त्याच्या डोक्यावर मुस्लीम घालतात तशी टोपी असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता.
हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांनी चिथावणीखोर भाषण दिल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते हडपसर भागात फिरत होते. त्यावेळी मुळचा सोलापूरचा असणारा मोहसीन शेख दिसला. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत लाकडी बॅटने मोहसीनला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची खटला लढण्यासाठी नेमणूक केली होती. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निकम यांनी माघार घेतली. गेली आठ वर्षांपासून हा खटला सुरु होता. आता या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी धनंजय देसाई यांच्यासह २० आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.