सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी (Mumbai) ओळख वाढवून, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि नंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याच नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आदर्श म्हात्रे असं या आरोपीचं नाव असून, त्याच्या या भामटेगिरीमुळं डोंबिवली आणि पनवेल परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या आरोपीला यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मात्र, आता डोंबिवलीतील एका पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी त्याला गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल परिसरात राहणारा आदर्श म्हात्रे हा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून तरुणींशी संपर्क साधत असे. सुरुवातीला गोड बोलून मैत्री करायची आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा, हा त्याचा ठरलेला पॅटर्न होता.
आणखी एक खरात! स्वतःला बाळूमामा भासवून फसवणूक करणाऱ्या भोंदूला बेड्या; राजकीय कनेक्शन समोर येणार?
एकदा का तरुणी विश्वासात आली की, तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करायचे. त्यानंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये संबंधित तरुणींच्या नावावर आणि कागदपत्रांवर हा भामटा लाखो रुपयांची कर्जे काढून त्यांची फसवणूक करत होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या गुन्ह्याची व्याप्ती पाहून अधिकारीही चक्रावून गेले आहेत. आदर्श म्हात्रे याने आतापर्यंत तब्बल 140 हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी 11 धाडसी तरुणींनी स्वतः पुढे येऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अधिकृत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी म्हात्रे सध्या मानपाडा पोलिसांच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
या संपूर्ण फसवणुकीच्या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. आदर्श म्हात्रे याच्या फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला या उच्चशिक्षित असून विविध नामांकित क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये आर्थिक क्षेत्र, कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यावसायिक क्षेत्रातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना तो जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर डोंबिवलीतील एका पीडित तरुणीने मानपाडा पोलिसात धाव घेतली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधातील इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
