मुंबई : मुंबई महापालिकेचं (BMC Budget) सादर झालेलं बजेट मुंबईकरांचं नसून वर्षा बंगल्यावरुन छापून आलेलं कंत्राटदार मित्रांच बजेट आहे, असा हल्लाबोल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केला आहे.
बजेटमध्ये नवीन कोणताही प्रोजेक्ट नाही. आमच्या काळातील अनेक प्रकल्प या बजेटमध्ये आहेत. आज जे पन्नास हजार कोटींचे बजेट सादर केले. त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेले प्रकल्प आहेत. मग हे बजेट पन्नास हजार कोटींच्या पुढे गेलं कसं? नवीन कोणताही प्रोजेक्ट नसेल तर खर्च वाढला कुठं? कंत्राटदारांना मदत करण्यासाठी बजेट सादर झालं आहे का? असा सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मी एक मुंबईकर म्हणून महापालिकेला सुचना केली होती की कोणताही नवीन प्रोजेक्ट जाहीर करु नका. कारण अशा प्रकारची घोषणा घटनेला धरुन होणार आहेत. त्यामुले आज जाहीर झालेल्या बजेटमध्ये कोणताही नवीन प्रोजेक्ट जाहीर झालेला नाही. त्यांनी जे काही छोटे मोठे प्रकल्प जाहीर झालेत त्यावर आम्ही आभ्यास करु. त्यावर जी काही कायदेशीर कारवाई करायची ती करु, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या बजेटसारखं आमचं मुंबई महापालिकेच्या बजेटवर लक्ष होतं. केंद्राच्या बजेटमध्ये मुंबईला आणि महाराष्ट्राला काहीचं मिळाले नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प, डोवोस दौऱ्यासंदर्भात मी केलेल्या आरोपाला अजून कोणतेही उत्तर आले नाही. मुंबईतील रस्ता घोटळ्यात मी विचारलेला प्रश्न घोटाळा झालाय का? सेटिंग झालंय का? भूमिपुजन होण्याच्या आदल्यादिवशी मुंबई महापालिकेने एक पत्रक काढून सांगितले होते की कोणतीही चर्चा न करता टेंडर देऊ पण मी घेतलेली भूमिका लोकांपर्यंत आणि मुंबई महापालिकेपर्यंत पोहचली. त्या टेंडरमध्ये मुंबईचे चारशे ते साडेचारशे कोटी वाचवले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.