Download App

‘अहंकारी माणूस कधीही देश चालवू शकत नाही’, अरविंद केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल

Arvind Kejriwal on Narendra Modi : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारला अहंकार झाला आहे. स्वार्थ आणि अहंकारासोबत जगणारी व्यक्ती कधीच देश चालवू शकत नाही, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी आभार मानले. पुढं ते म्हणाले की दिल्लीच्या लोकांनी आपल्या अधिकारासाठी आठ वर्षे खुप मोठी लढाई लढली आहे. दिल्लीमध्ये आमचे सरकार 2015 मध्ये स्थापन झाले. आमचं सरकार आल्यानंतर तीन महिन्यांत आमची सर्व शक्ती काढून घेतली. एक छोटा अध्यादेश जारी करत मोदी सरकारने आमची सर्व शक्ती काढली होती. त्यानंतर आम्ही आठ वर्षे लढाई लढली. पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर आठ दिवसांत केंद्र सरकारने नवीन अध्यादेश काढत आमची सर्व शक्ती काढून घेतली. कोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकारचा हा अध्यादेश आहे.

आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; 2 दिवसांपूर्वीच घेतली होती फडणवीस-बावनकुळेंची भेट

भाजपची लोकं म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टाला मानत नाही. यांच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजला शिव्या दिल्या आहेत. त्यांची लोकं जजच्या विरोधात आणि कोर्टाच्याविरोधात सोशल मीडियावर कॅपेन चालवतात. रिटायर जजला ते अँटी-नॅशनलिस्ट म्हणतात. त्यांनी आता एक मॅसेज दिला आहे की सुप्रीम कोर्टाने काहीही निर्णय देऊ द्या आम्ही तो मानत नाही. असं केलं तर देश कसं चालेल, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

केजरीवाल यांनी पुढे सांगितले की, शिवसेनेने हे भोगलं आहे. बहुमताने निवडून आलेल्या आणि जनतेने निवडून दिलेल्या शिवसेनेच्या सरकारला यांनी पैसे देऊन आणि सीबीआयच्या धाडी टाकून पाडलं. एखाद्या राज्यात भाजपचे सरकार तयार झाले नाही तर ते आमदार खरेदी करुन सरकार पाडतात. नाही तर सीबीआय आणि ईडीचा धाक दाखवून आमदारांना तोडून सरकार पाडतात. दिल्लीमध्ये त्यांनी ऑपरेशन लोटस केलं प ते अपयशी झाले. आमचे देखील आमदार त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला पण तसे झाले नाही. आमचे सरकार पडत नाही तेव्हा त्यांनी अध्यादेश काढून आमचे अधिकार काढून घेतले, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

महाविकास आघाडीला ब्रेक, ठाकरे-शिंदे येणार एकत्र ?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ

ते पुढं म्हणाले की मोदी सरकारला खूप अहंकार झाला आहे. एखाद्या व्यक्तीला खूप अहंकार झाला तर ती व्यक्ती स्वार्थी होते. स्वार्थ आणि अहंकारासोबत जगणारी अशी व्यक्ती देश चालवू शकत नाही. ते देशाबद्दल विचार करत नाहीत. हा अहंकारचा परिणाम आहे. अहंकारमुळे काहीच वाचत नाही. ही लढाई फक्त दिल्लीची नाही तर संपूर्ण देशाची आहे. ही लढाई संविधान आणि लोकशाहीची आहे, असे केजरीवाल म्हणाले.

Tags

follow us