मुंबई : भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानींवर (Adani Group)हल्ला झालाय. अदानींवरील हल्ला हा भाजपच्या (BJP)रिझर्व्ह बँकेवर हल्ला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. आज सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अदानींच्या साम्राज्यावर हल्ला का झाला? याचं कारण एकच, अदानी आणि मोदी असून, अदानी आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेची एवढी मोठी लूटमार सिद्ध होऊन देखील भाजप गप्प का आहे. यामुळं ते सिद्धच झाले. अदानी म्हणजे भाजप याचा अर्थ स्पष्टच आहे. अदानी यांच्याकडं भाजपचा पैसा गुंतलाय आणि तेच भाजपचे मुख्य अर्थ पुरवठादार असल्याचाही आरोप खासदार राऊत यांनी केलाय.
राऊत म्हणाले, मुळात गौतम अदानी व त्यांच्या उद्योगाचं साम्राज्य तकलादू पायावरच उभं होतं. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका फुंकरीनं ते कोसळलंय. त्याचा फटका संपूर्ण देशाला बसलाय. अदानी यांच्या आर्थिक साम्राज्याचा मुखवटा ओढणं हा देशावरचा हल्ला असं आता सांगितलं जातंय. अदानी म्हणजेच भारत असं आता बोललं गेलं. हा भारतमातेचा अपमान असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.
राऊत म्हणाले, अदानी प्रकरणामुळं जगात भारतीय अर्थव्यवस्थेची लक्तरं निघाली आहेत. एखाद दुसऱ्या उद्योगपतींच्या करंगळीवर एखाद्या महान देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असावा हे हास्यास्पदच होतं, पण गेल्या सात-आठ वर्षांत हा पोकळ डोलारा उभा राहिला. ही करंगळी अदानी यांची होती की प्रत्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हा संशोधनाचा विषय आहे.
मोदी म्हणजेच भारत असं सांगितलं जात असतानाच उद्योगपती गौतम अदानी यांनी स्वतःची तुलना भारताशी केली व आपल्या फसवणुकीवर झालेला हल्ला हा भारतावरील हल्ला असल्याचा दावा केला. त्यामुळं नक्की भारत किती व भारत कोणाचा? असा प्रश्न पडलाय. गौतम अदानी कोण? हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही. मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानी व त्यांच्या उद्योग साम्राज्याची श्रीमंती वाढत गेली, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय.