पुणे : भारतीय खेळ नवोदित खेळाडूंमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोचावा यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून पुण्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक 2023-निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेला राज्यभरातील मल्लखांब प्रेमींसह परदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली. मल्लखांबची प्रात्यक्षिके पाहून हा अतिशय उत्कृष्ट आणि शरीरासाठी उपयुक्त व्यायाम असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेची मान्यता असलेली ही स्पर्धा पटवर्धन बाग येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोरील मैदानावर होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे सहकार्य लाभले असून दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच 750 पेक्षा जास्त खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवत आहेत.
आज पहिल्याच दिवशी नेदरलँड्सचे हर्बर्ट एगबर्ट्स आणि लेस्ली विल्किस या परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. हे दोघेही क्रीडा प्रेमी असून, महाराष्ट्रातील मातीतल्या खेळांवर संशोधन करत आहेत. आज उद्घाटनप्रसंगी मुलांनी मल्लखांबची विविध प्रात्यक्षिके सादर केली. ही सर्व प्रात्यक्षिके पाहून हर्बर्ट आणि लेस्ली अतिशय प्रभावित झाले. मल्लखांब हा शरीरासाठी अतिशय उत्तम व्यायाम प्रकार असून, याचा प्रचार आणि प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली.