पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात दहशत निर्माण करण्याऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या पुण्याची वाटचाल भाईगिरीकडे सुरु झाली की काय ? असं वाटू लागलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण रस्त्याने जाताना ओळख दाखवत असताना भाई म्हंटल नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात रॉड घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नवी खडकीतील शिवाजी पुतळा चौक येथे घडलाय.
याप्रकरणी संतोष साळवे (वय ३६, रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुवार पोलिसांनी प्रफुल्ल ऊर्फ कान्या सोनवणे (वय ३०, रा. नवी खडकी), संकेत मोरे ऊर्फ मेड्या (रा. यशवंतनगर, येरवडा) आणि सोनु मोरे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासह महेश सुरेश पवार यांच्या अशा चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ४ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साळवे हे जीममधून व्यायाम करुन दुचाकीवरुन घरी जात होते. याचवेळी चौकात त्यांच्या ओळखीचे आरोपी थांबले होते. तेव्हा संतोष याने प्रफुल्ल सोनवणे याला काय पप्या काय चालले आहे?, असे विचारले. तेव्हा जवळच उभा असलेल्या संकेत मोरे याने फिर्यादी याला थांबवून ‘काय तुला लय माज आला आहे का ?, तुला भाई बोलता येत नाही का तू लय मोठा भाई झाला का? असे बोलून शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
संकेत मोरे याने संतोषच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्याचा मोबाईल फोडला. इतर लोक भांडणे सोडविण्यासाठी येत असताना त्यांनी हवेत लोखंडी रॉड फिरवून लोकांना ‘तुम्ही इथे थांबू नका याला आम्ही जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून दहशत निर्माण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करत आहेत.