पुणे: चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad by-election) बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. याची जबाबदारी आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्याकडे दिली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.
निवडणूक होऊ नये झाली तर कशी लढवायची यासाठी आम्ही आजची बैठक बोलवली होती. भाजपमधून काही नेत्यांनी पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकरणात इच्छा असणे काही चुकीचे नाही. पण त्या सगळ्यांना भेटण्याची, बोलण्याची आमच्याकडे व्यवस्था आहे. अन्य पक्षाप्रमाणे प्रासंगिक नाही. उमेदवाराचा निर्णय कोअर कमिटी करेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
भाजप ही ‘थिंक इन अॅडव्हन्स, थिंक इन डिटेल’ अशा कार्य पद्धतीची असल्याने गाफिल न राहता पुर्वतयारीसाठी आम्ही चिंचवडला आलो आहेत. आमची ही बैठक उमेदवार ठरवण्यासाठी नाही. उमेदवारी ठरवण्याची भाजपाची प्रक्रिया ठरली आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
इच्छूकांची नावे प्रदेश कमिटीकडे जातात, त्यानंतर ही नावे केंद्राकडे जातात. आणि दिल्लीतून उमेदवार ठरवला जातो. त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही कार्यालय कुठं करावं, मेळावा कधी करावा, बुथ प्रमुखांना काही अडचणी आहेत का अशा चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची आज भूमिका ठरणार आहे. पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटलांची बैठक असून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि बंधूंनाही बैठकीचं निमंत्रण दिलं आहे.
अगोदर 27 फेब्रुवारीला निवडणूक लागली होती. आज सकाळीच निवडणूक आयोगाने त्यामध्ये दुरुस्ती केली आहे. 27 फेब्रुवारीला सोमवार होता. एका पोटनिवडणुकीसाठी सुट्टी जाहीर करता येत नाही. त्यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता होती. मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी तारखेत दुरुस्ती करुन 27 ऐवजी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 2 मार्चला मतमोजणी होत आहे.