Download App

नाईकांचा दरबार पुन्हा भरणार… एकनाथ शिंदेंना ‘ठाणे’ जड जाणार?

गणेश नाईक. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याआधीचे ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट होते. ते शिवसेनेत (Shivsena) असो, राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये असो. ठाणे, नवी मुंबईचं सगळं राजकारण त्यांच्याच भोवती फिरतं होतं. पण मागच्या 10 वर्षांत एकनाथ शिंदे यांनी नाईकांच्या वर्चस्वाला पद्धतशीर सुरूंग लावाला होता. त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली होती. पण नाईक आता पुन्हा मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे पालघरचे पालक मंत्रीपद देण्यात आले आहे. अशात नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील जनता दरबार पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. (BJP leader Ganesh Naik has decided to challenge Deputy Chief Minister Eknath Shinde in Thane itself.)

नाईक फक्त घोषणा करून थांबलेले नाहीत. तर “पालघरचा पालकमंत्री असलो तरी ठाणे शहरात जनता दरबार घेणार आणि ठाण्याचा कारभार सुरळीत करणार, शहरासह जिल्ह्यात ‘ओन्ली कमळ फुलवणार’, असे आव्हान त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना दिले आहे. नाईक हे सुमारे 10 वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. त्यावेळीही त्यांचा महिन्यातून एकदा जनता दरबार भरत होता. त्यात त्यांनी खंड पडू दिला नाही. आता पुन्हा केलेल्या या घोषणेने ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी वेळोवेळी केलेल्या कोंडीचा नाईक हिशेब चुकता करणार, असे बोलले जात आहे.

पण नाईक विरूद्ध शिंदे यांच्यातील हा वाद नेमका आहे तरी काय? शिंदेंनी नाईकांची कधी-कधी आणि कुठे-कुठे कोंडी केलेली?

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पूर्वीपासूनच विळ्या भोपळ्याचे वैर. दोघंही ठाणे जिल्ह्यातीलच नेते. दोघंही शिवसेनेतीलच होते. पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना बरेच सिनिअर. म्हणजे शिंदे पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा नाईक दोन वेळा आमदार आणि एकदा मंत्रीही राहिले होते. पुढे ते राष्ट्रवादीमध्ये गेले. तिथे ते दुसऱ्यांदा मंत्री झाले. ठाण्याचे पालकमंत्रीही झाले. त्यांचा एक मुलगा आमदार आणि दुसरा मुलगा खासदार झाला. महापालिकाही ताब्यात घेतली. थोडक्यात सगळी सत्ता स्थाने नाईकांनी आपल्याकडे घेतली होती. या काळात नाईक यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची पुरती कोंडी केली होती. पण 2014 मध्ये नाईकांचा भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभव झाला. त्याचवेळी शिंदे मंत्री झाले, ठाण्याचे पालकमंत्री झाले. तिथून शिंदेंनी नाईकांच्या राजकारणाची सव्याज परत फेड करायला सुरुवात केली.

नाईक यांच्या आताच्या नाराजीची सुरुवात झाली ती महायुतीची सत्ता आल्यानंतर. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यात भाजपनेही नाईकांना मंत्रि‍पदावरुन डावलले. लोकसभा निवडणुकीतही नाईक ठाणे मतदारसंघासाठी आग्रही होते. त्यांचे चिरंजीव संजीव नाईक यांना भाजपकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांनी फील्डिंगही लावली होती. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला नाईक यांनी यापूर्वी एकदा ताब्यात घेतला होता. त्यामुळे भाजपलाही नाईकांबाबत कॉन्फिडन्स होता. पण एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी हातातोंडाशी आलेला हा घास हिरावून घेतला. त्यातून नाईक आणखी दुखावले गेले. नवी मुंबईत त्यांनी जणू असहकार पुकारला.

VIDEO : ‘राजीनामा दिला तरच…अजित पवारांच्या बोलण्याला अर्थ’; विजय वडेट्टीवारांचं सूचक विधान

गणेश नाईक यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचार करायला असमर्थता दर्शवली. भाजपमधील नाईक समर्थक पदाधिकारी राजीनामा देत होते. त्यांची समजूत काढण्यासाठी थेट फडणवीस यांना नाईकांचे क्रिस्टल हाऊस गाठावे लागले होते. त्यावेळी “नवी मुंबईत सबकुछ गणेश नाईक आहेत”, असे आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी म्हस्केंच्या प्रचाराला सुरुवात केली. पण प्रत्यक्षात नवी मुंबईतून शिवसेनेचे लीड तब्बल 68 हजारांनी घटले. सिडको, नवी मुंबई महापालिका, एमएमआरडीए यांसारख्या संस्थांवर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांचीच सद्दी चालत होती. या संस्था म्हणजे नाईकांची एकेकाळीची सत्तास्थाने होती. पण या संस्थांवर आणि नवी मुंबई महापालिकेत नाईक यांची कोंडी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हे अधिकारी नाईक यांना जुमानत नव्हते. महापालिकेतील कंत्राटी कामे, महत्त्वाचे निर्णय ठाण्यातून घेतले जात असल्याची नाईक समर्थकांची तक्रार होती.

आपल्या समर्थकांची साधी साधी कामे करून घेण्यासाठी देखील नाईकांना महापालिका मुख्यालयात जोडे झिजवावे लागले होते. नाईकांचा एक कट्टर विरोधक तर महापालिकेतील 270 कोटींची कामे आपल्याकडे आहेत हे टि‍पेच्या सुरात नवी मुंबईत सांगत होता. एकनाथ शिंदे यांनी 111 प्रभागांमध्ये 11 प्रभागांची वाढ करून एकूण प्रभागांची संख्या थेट 122 पर्यंत नेली होती. या रचनेतून नाईकांची कोंडी करण्याची योजना असल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. पण या दोन्ही निर्णयांमध्ये आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार नाईकांची होती. त्यामुळे त्यांनी या निर्णयांना कडाडून विरोध केला होता.

गणेश नाईक यांचे विरोधक असलेल्यांना एकनाथ शिंदे यांनीही नेहमीच बळ दिले. त्यातूनच शिंदे यांच्याबद्दल गणेश नाईक बोलले की याचे उत्तर विजय चौगुले यांच्यासारखे नेते देऊ लागले. बेलापूरच्या भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि नाईक यांच्यामध्ये विस्तवही जात नाही. अशात मुख्यमंत्री मंदाताई म्हात्रे यांना निधीची पोतडी खुली करून देतात, त्यांना नेहमीच झुकते माप दिले जाते. त्या म्हणतील ती कामे मुख्यमंत्री करतात, असा आरोप नाईक यांनी केला होता. नाईक समर्थकांना फोडण्यामध्ये देखील शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. याच सगळ्या खदखदीमधून एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आहेत. पण देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत, असे गणेश नाईक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगत जाहीररीत्या शिंदेंचे वाभाडे काढले होते.

बीडची बदनामी अन् अजितदादांसमोरच मुंडे, धस, सोनावणेंमध्ये बाचाबाची; जिल्हा नियोजन बैठकीत घडलं काय?

आता एकनाथ शिंदे यांचे डिमोशन झाले आहे. ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात आले आहे, शिवाय ठाण्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे. पण गणेश नाईक यांनाही पुन्हा लाल दिवा मिळाला आहे. त्यांनी मागच्या पाच वर्षात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रत्येक कोंडाच हिशोब करण्याचा चंग बांधला आहे. त्याची झलक काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बघायला मिळाली. भाजपच्या सर्व आमदारांनी मिळून शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. निधीची आक्रमकपणे मागणी केली. या आमदारांचे नेतृत्व एकप्रकारे गणेश नाईक करत होते. आता त्यांनी जनता दरबार पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली आहे. शिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर या महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढेल. ठाण्यात कमळ फुलविण्यासाठीच माझ्याकडे जबाबदारी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

याच सगळ्यामुळे पुढील पाच वर्षे ठाणे जिल्ह्यात भाजप विरूद्ध एकनाथ शिंदे आणि त्यातही नाईक विरूद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे.

follow us