CM Devendra Fadnavis on Nagpur Violence : नागपूर शहरात सोमवारी रात्री मोठा (Nagpur Violence) राडा झाला. दोन्ही गटात दंगल उसळून जोरदार दगडफेक झाली. संतप्त जमावाने परिसरातील दुचाकी चारचाकी वाहनांना आगाी लावल्या. हा कट पूर्वनियोजित असल्याचा दावा आता केला जात आहे. दुसरीकडे या प्रकरणावरुन राजकारण सुरू झाले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या सगळ्या घडामोडींत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केल आहे. नागपुरातील घटनेत ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्या कुणालाच सोडणार नाही, असे थेट इशारा फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळ सभागृहात बोलत होते. ते पुढे म्हणाले, काल नागपूर शहरातील महाल परिसरात साडे अकरा वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव अशा घोषणा देत आंदोलन केले. आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. यानंतर सायंकाळी अफवा पसरली गेली. यानंतर दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव जमला. घोषणा देऊ लागला. यानंतर या लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला.
याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची तक्रार द्यायची असे सांगितले होते. त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे हंसापूरी भागात काही लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला.
“नागपुरात परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांनी आता..” गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय सांगितलं?
तिसरी घटना भालदारपुरा भागात झाली. 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता. तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे अश्रूधुर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेतही काही वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत. यातील एका पोलीस अधिकाऱ्यावर थेट कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या घटनेत एकूण पाच नागरिक जखमी झाले आहेत. या संदर्भात एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळी घटना घडल्यानंतर मधल्या काळात शांतता होती. पण संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचे लक्षात येत आहे. कारण एक ट्रॉली भरून दगड मिळालेले आहेत. शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात होते. हे शस्त्र आता जप्त करण्यात आले आहे. वाहनांची जाळपोळ झाली. काही ठराविक घरे आणि कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले. तीन डीसीपी लेव्हलचे लोक जखमी झालेत. यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसून येत आहे अशा लोकांवर कारवाई केलीच जाईल. कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.