Download App

चंद्रकांत पाटलांची स्वतःच्या जिल्ह्यातून…, शरद पवारांची खोचक टीका

पुणे : चंद्रकांत पाटील हे शक्तिमान गृहस्थ आहेत. ते कोल्हापूरवरून कोथरूडला आले आहेत. त्यांचं कोथरूडसाठी काय योगदान आहे हे कोथरूडकरांना विचारलेलं बरं, ज्यांची आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातून निवडून येण्याची क्षमता नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं.

त्यांनी आज महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या शिवराज राक्षे यांचा आपल्या घरी बोलावून सत्कार केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी पुणे ही कोणाचीही मक्तेदारी नाही, अशी अप्रत्यक्ष पवारांवर टीका केली होती.

याबाबत माध्यम प्रतिनिधी पवारांना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता पवारांनी त्यावर सडेतोड उत्तर देत पाटलांना स्वतःच्या जिल्ह्यातूनच निवडून येण्याची क्षमता नाही आणि त्यांचं पुण्यासाठी आणि कोथरूडसाठी काय योगदान आहे? असा सवालही आपण कोथरूडच्या नागरिकांना विचारावा असाही टोला पवारांनी लगावला.

आता पवारांच्या या टीकेवर चंद्रकांत दादा काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबतही पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us