Download App

Chandrakant Patil : भाजपने किती निवडणुका बिनविराेध केल्या… यादीच वाचून दाखवली  

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा निवडणुका बिनविराेध हाेणार नाही का, या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. आम्ही यापूर्वी हिंगाेलीचे खासदार राजीव सातव, मुंबईतील अंधेरीची पाेटनिवडणूक बिनविराेध केली आहे. तसेच अशी खूप माेठी यादी वाचून दाखवू शकताे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक जिंकणारच असा निर्धार भाजपा पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड निवासस्थानी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे एकप्रकारे कोरं पाकीट असतात. पक्ष नेतृत्व जे काम सांगेल ते कार्यकर्ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतात.‌ त्यामुळे विधानसभेच्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डकडून ठरविण्यात येईल. पण त्यापूर्वीच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळणारे मताधिक्य वाढविण्यावर सर्व कार्यकर्त्यांचा भर आहे.

Tags

follow us