Download App

गजानन कीर्तिकरांच्या जागी सिद्धेश कदम कन्फर्म? CM शिंदेंनी मुंबईत दिली मोठी जबाबदारी

मुंबई : शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या जागी आगामी लोकसभेला (Lok Sabha) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कदम यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत मोठी जबाबदारी दिली आहे. शिंदे यांनी आज (6 डिसेंबर) राज्यात शिवसेनेच्या विभागीय संपर्क नेत्यांची आणि लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात मुंबई शहराच्या विभागीय संपर्क नेतेपदी सिद्धेश कदम यांची नियुक्ती केली आहे. (Chief Minister Eknath Shinde has appointed Siddesh Kadam as Divisional Liaison Leader of Mumbai City)

गजानन कीर्तिकर हे सध्या मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र वयाच्या आणि तब्येतीच्या कारणास्तव ते आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. हेच ओळखून “गजाभाऊंच वय झालं आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात गजानन किर्तीकर उभे राहिले नाहीत तर त्या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील. तो आपला हक्क आहे आणि अधिकारी आहे, असे म्हणत रामदास कदम यांनी त्यांच्या मुलासाठी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला.

बावनकुळेंच्या पोटातलं ओठावर आलं… शिंदे आणि अजितदादा समजून घ्या!

पण त्यांच्या या दाव्यावरुन रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात मोठा वाद झाला. दोन्ही नेत्यांनी जाहिररित्या एकमेकांचे वाभाडे काढले. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो मी खेचून आणला. 2014 ला पावणे दोन लाख तर 2019 ला पावणे तीन लाख मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात मी कामं केली आहेत, करोडो रुपयांचा फंड वापरलाय, लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे, आजही लोकांमध्ये वावरत आहे. त्यामुळे इतर कुणीही या मतदारसंघावर दावा सांगू शकत नाही, असे प्रत्युत्तर किर्तीकर यांनी दिले होते.

मात्र इथेच रामदास कदम यांना राजकारणाचा वास आला. गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहेत. त्यांना पक्षाने उत्तर-पश्चिम मतदारसंघातून यापूर्वीच उमेदवारीची घोषणा केली आहे. यामुळे कीर्तिकर आपल्या मुलासाठी मतदारसंघ सुरक्षित करत आहेत, असा संशय कदमांना आला आणि वादाची ठिणगी पडली. कदमांनी कीर्तिकरांवर थेट गद्दारीचे आरोप केले. या आरोपांनी घायाळ झालेल्या कीर्तिकरांनी इतिहास काढत कदमच शिवसेनेशी गद्दारी करत असल्याचा आरोप केला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली.

तहसीलदार-अधिकारी मंत्र्यांच्या वाड्यावर तर जनतेचे प्रश्न वाऱ्यावर, ठाकरे गटाचा विखेंवर निशाणा

यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांमधील वाद मिटविला. तर कदम यांनी त्यांचा दावा मागे घेतला. मात्र आता सिद्धेश कदम यांना मुंबईच्या विभागीय संपर्क नेतेपदाची जबाबदारी दिली आहे. सिद्धेश कदम यांना ही ताकद आगामी लोकसभेच्या तयारीसाठी दिली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांच्या जागी आगामी लोकसभेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज