बावनकुळेंच्या पोटातलं ओठावर आलं… शिंदे आणि अजितदादा समजून घ्या!

  • Written By: Published:
बावनकुळेंच्या पोटातलं ओठावर आलं… शिंदे आणि अजितदादा समजून घ्या!

पुणे :  आपल्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा वानखेडे मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यायची आहे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekahr Bawankule on Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सीएम इन वेटिंग असलेले अजित पवार दोघांच्या समर्थकांच्या पोटात गोळा आणला आहे. बावनकुळे यांनी पहिल्यांदाच असे विधान केलेले नाही. पण आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतर बावनकुळेंचा आणि भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यातूनच आपल्या मित्रपक्षांना बावनकुळेंनी भाजपच्या मनातील भावना जाहीरपणे सांगत आगामी काळातील वस्तुस्थितीची पूर्वकल्पना दिली आहे.

उत्तरेत भाजपचा बंपर विजय; आनंदाच्या भरात बावनकुळेंनी फोडलं मुख्यमंत्री अन् शपथविधीचं ठिकाण

राज्यात आमदारांची सर्वाधिक संख्या असतानाही भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना परिस्थितीमुळे सत्तेत दुय्यम भूमिका घ्यावी लागली आहे. याची बोच भाजपला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार, हा फडवणीस यांना जुना व्हिडीओ भाजपच्या अधिकृत सोशलल मिडिया हॅंडल झाला होता. त्यावरून बरेच वादळ निर्माण झाल्यानंतर भाजपला तो हटवावा लागला. कोणी व्हीडीओ पोस्ट करून पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतो का, असा सवाल करत फडणवीस यांनी त्या वादावर पडदा टाकला होता. पण आता  हिंदी पट्टयातील घवघवीत यशानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातूनच आता बावनकुळेंचा फडणविसांना पुन्हा वानखेडेवर मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याचा  व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला.

बरं बावनकुळे हे पहिल्यांदाच असे बोलले आहेत, असे नाही. या आधी पण माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे, असं कार्यकर्त्यांनी त्यांनी वर्षभरापूर्वीच सांगितल होतं. त्यावरही सारवासारव त्यांना करावी लागली होती. पण आता पुन्हा पोटातलं ओठावर आलं आहे. भाजपचे दुसरे नेते चंद्रकांत पाटील यांनी तर एकनाथ शिंदे यांना काळजावर दगड ठेवून भाजपनं मुख्यमंत्री केल्याचं सांगितलं होतं. तेव्हाही भाजपच्या मनसुब्याबद्दल शंका व्यक्त झाली होती.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, अशी गळ मीच पक्षश्रेष्ठींना घातली होती. असा दावा फडणवीस यांनी केला होता. पण शिंदे मुख्यमंत्री बनल्याचे भाजपला सहन होत नाही, असेच त्यांच्या नेत्यांच्या विधानावरून दिसतं. शिंदे यांच्या आमदारकीच्या अपात्रतेविषयी नेहमीच चर्चा होत असते. ३१ डिसेंबर नंतर त्यांचे पद जाणार, अशीही कुजबूज सुरू असते. त्यातूनच मग भाजपचे असे अंतस्थ हेतू बाहेर पडतात का, अशीही शंका त्यानिमित्ताने राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. शिंदे यांचे पद गेले तर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, असे बोलले जाते. पण आता तीन राज्यांतील अनुकूल निकालानंतर  भाजप आता बॅकफूटवर खेळणार नाही. त्यामुळेच राज्यात पुन्हा नंबर एकचे पद मिळविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचे ध्येय पक्षाने ठेवले आहे. परिणामी शिंदे आणि अजितदादा यांच्यासाठी बावनकुळेंचे विधान हा सूचक इशारा आहे. राजकारणात कोणी दुसऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी पक्ष चालवत नाही. भाजप तर अजिबात असे करणार नाही. आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे भाजपचे नेते सांगत असले तरी त्यांच्या खुर्चीखाली टाइमबाॅम्ब आहे, हे बावनकुळेंनी दाखवून दिले आहे. आता शिंदे यातून कसा मार्ग काढणार, याची उत्सुकता आहे. अजितदादा यांच्यासाठी तर मुख्यमंत्रीपद आणखीन लांब जाणार, हे वेगळे सांगायला नकोच.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube