Download App

Chinchwad Assembly Bypoll : लक्ष्मण जगतापांचा भाऊच उमेदवार ?

  • Written By: Last Updated:

पुणेः चिंचवड विधानसभेच्या (Chinchwad Assembly constituency) पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर या जागेवर दिवंगत लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या घरातील उमेदवार निवडणुकीची रिंगणात असणार आहे हे निश्चित झाले आहे. जगताप यांचा भाऊ शंकर जगताप (Shankar Jagtap) यांचे नाव भाजपकडून निश्चित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने निवडणुकीच्या तयारीची सूचना ही पक्षाकडून त्यांना देण्यात आली आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच दुर्धर आजाराने निधन झाले. त्यामुळे या जागेवर आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या जागेसाठी जगताप यांचे पत्नी अश्विनी जगताप किंवा मुलगी एेश्वर्या जगताप यांना उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात होते. जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचे नावही चर्चेत होते. पण पक्षश्रेष्ठीने शंकर जगताप यांचे नाव अंतिम केले आहे. शंकर जगताप हे राजकारणात असून, ते माजी नगरसेवक आहेत. तसेच ते चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी राहिले आहेत.

निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या घरातील उमेदवार असल्यास विरोधी पक्षही येथे उमेदवार देत नाहीत. काही मतदारसंघातही विरोधी पक्षांनी हा नियम पाळला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व लक्ष्मण जगताप यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष येथे उमेदवार देणार नाही, असे राजकीय चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीतून महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीत कलाटे आणि काटे असे दोन गट होऊ शकतात. ज्यांना तिकीट मिळणार नाही. ते अपक्ष निवडणूक लढणार हे निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला संभाव्य बंडखोरीचा धोका आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

चिंचवडमध्ये 5 लाख ६६ हजार मतदार

चिंचवडमध्ये मतदारसंघात ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत. तर ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ महिला आणि ३५ इतर मतदार आहेत. हेच मतदार आता चिंचवडचा नवीन आमदार ठरवतील.

Tags

follow us