मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’च्या पहिल्याच दिवशी देवरा यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना (UBT) गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Congress leaders ‘shocked’ by Milind Deora’s resignation)
दरम्यान, देवरा यांच्या या राजीनाम्याचा आणि त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाचा काँग्रेस नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी देवरा यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचाच दिवस निवडल्याने त्यांच्या निर्णयावर खंतही व्यक्त केली. जयराम रमेश यांनी तर देवरा यांच्या या निर्णयाच्या घोषणेचे टायमिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ठरविले असल्याचा आरोप केला आहे.
मिलिंद देवरांच्या काँग्रेस सोडण्याच्या घोषणेचे टायमिंग पंतप्रधान मोदींनी फिक्स केले :
जयराम रमेश यांनी मुरली देवरा यांचा दाखला देत मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली. “मुरली देवरा यांच्यासोबतचा माझा प्रदीर्घ वर्षांचा सहवास राहिला आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जिवलग मित्र होते. तरीही ते काँग्रेससोबत कायम खंबीरपणे उभे राहिले,” असे त्यांनी म्हटले. इतकंच नाही तर मिलिंद देवरांच्या काँग्रेस सोडण्याच्या घोषणेचे टायमिंग पंतप्रधान मोदींनी फिक्स केले, असा आरोपही त्यांनी केला.
दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन… :
देवरा यांच्या या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “आजपासून सुरु होणाऱ्या राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटी यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत.
काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजप, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे.
राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून… :
आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल, अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस कार्यकर्ता म्हणून याबद्दल मला वाईट वाटतं :
मिलिंद देवरा तुम्ही हा निर्णय घेतला हे दुर्दैव आहे. वैयक्तिक पातळीवर आणि काँग्रेस कार्यकर्ता म्हणून याबद्दल मला वाईट वाटत आहे. देवरा कुटुंबाचा काँग्रेस परिवाराशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. काँग्रेस पक्ष ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात करत असताना त्याच दिवशी तुमची घोषणा झाली, हे देखील खेदजनक आहे,” असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटले.