Download App

मर्जीतील अधिकाऱ्यांना दूर सारलं अन् फडणवीसांनी पवारांना केलं जवळ : दोन्ही उपमुख्यमंत्री आता शेजारी!

मुंबई : काल-परवापर्यंत एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्या, एकमेकांवर टीका करणाऱ्या आणि आता एकाच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे संबंध सत्तेत येताच मधूर झाल्याचे दिसून येत आहे. इतकंच नाही तर मंत्रालयातही त्यांचे सूर जुळताना दिसून येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मर्जीतील दोन अधिकाऱ्यांची दालने रिकामी करवून घेतली आहेत. यामुळे आता हे दोघे उपमुख्यमंत्री एकमेकांचे शेजारी बनले आहेत. (DCM Devendra Fadnavis and DCM Ajit Pawar will now seat together in ministry building)

त्याच झालं असं की, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दालन आहे. याच मजल्यावर फडणवीसांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आणि श्रीकर परदेशी यांना दोन दालने देण्यात आली होती. हे दोन्ही अधिकारी फडणवीसांच्या अत्यंत मर्जीतील मानले जातात. त्यामुळे, त्यांनी या अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयाच्या मजल्यावर दोन दालने दिली होती. पण आता अजित पवार यांच्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांची दालने रिकामी करवून घेण्यात आली आहेत. त्याचबरोबर फडणवीस यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही अन्यत्र हलविण्यात आले आहे. फडणवीस यांच्या या आदरातिथ्याची मंत्रालयात बरीच चर्चा सुरु आहे.

छगन भुजबळांना ओळखण्यात माझी चूक झाली… नाशिकमध्ये शरद पवारांची जाहीर कबुली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनीदेखील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील बंड आणि सरकारमधील सहभाग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

अजित पवारांनी कोणाचा पोपट मारला हे सिध्द; उदय सामंतांचा ठाकरे गटाला टोला

अजितदादांच्या युतीवर फडणवीस काय म्हणाले?

फडणवीस यांनी शुक्रवारी (7 जुलै) मुंबईमध्ये भाजपच्या महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार, नेत्यांची बैठक घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात अजित पवार यांच्या सोबतच्या युतीचे स्पष्टीकरण देत त्यांनी नेत्यांना एक आवाहन केलं.  ते म्हणाले, महाविकास आघाडी तुटणे आपल्यासाठी अत्यावश्यक होते. तिन्ही पक्षांची ताकद आपल्यासाठी अडचणीची ठरणारी होती. त्यामुळे आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागले. या पार्श्वभूमीवरच पवारांशी युतीचा निर्णय सर्वोच्च नेतृत्वाने घेतला होता. त्यामुळे त्यांना स्वीकारावे लागेल आणि त्यांचे स्वागत करावे लागेल. त्यांच्यासोबतच आपल्याला पुढील निवडणुका लढवायच्या आहेत, असं सांगत तडजोडीचं राजकारण स्विकारण्याचं आवाहन केल्याची माहिती आहे.

Tags

follow us