मुंबई : विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान (Aamir Khan) निर्मित ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) या सिनेमाचा विशेष शो आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदेंनी आपल्या मनोगतात हे मत व्यक्त केले.
दुबार पेरणीचं संकट, हवामान विभागाचा नवा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढणार
यावेळी बोलताना त्यांनी, विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा तयार केला असून, त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे. विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावं, याबाबत या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.
अभिनेते आणि निर्माते आमिर खान यांच्यासह दिग्दर्शक पी. एस. प्रसन्ना यांनाही हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच हा अवघड विषय तितक्याच तरलतेने मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी हा शो आयोजित करून शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधलं. देशात दिव्यांग मंत्रालय सुरू करणारे पहिले राज्य हे आपले महाराष्ट्र राज्य आहे. तसेच पालिका स्तरावर याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर शासन त्यासाठी नक्की सहकार्य करेल, असंही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अभिनेता आणि निर्माता आमिर खान, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, अनिल त्रिवेदी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.