Vishwas Nangre Patil’s Fake Account : सोशल मीडियावर (Social media) बनावट अकाउंट तयार करून इतरांना पैशांची मागणी करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र यातून पोलीस अधिकारी देखील बचावले नसल्याचे समोर येत आहे. आयपीएस अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nagre Patil) नावाने बनावट खाते तयार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर, बनावट खातं तयार करून भामट्यांनी नांगरे पाटलांच्या नावानेच सर्व सामान्यांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत स्वतः नांगरे पाटील यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे.
याबाबत नांगरे पाटील यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या फेसबुक खात्यावरून भामट्यांनी माझ्या जवळील मित्रांना पैशाची मागणी केली. आपल्या नावाने पैसे मागितल्याने अनेकांनी ते दिले देखील, मात्र काही दिवसातच हा बनाव उघड झाला आणि ते अकाउंट बंद करण्यात आले. मात्र संरक्षण करणारे पोलीसच जर फसवले जात असतील तर, सामान्यांचे काय असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
नेमकं काय घडलं?
आयपीएस अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने फेसबुकवर कोणी तरी बनावट खाते तयार केले. त्याच्या माध्यमातून मुलीला वैद्यकीय मदतीसाठी पैश्यांची गरज असून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. मदतीसाठी ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी क्यूआर कोड देण्यात आला. त्यावर पोलीस अधिकारी अशी मदत मागू शकतो का? याबाबत अनेकांनी विचार न करता पैसे पाठवले. तर काही जणांनी या बाबत विश्वास नागरे पाटील यांना संपर्क केला. आणि कोणीही मदत पाठवू नये असे आवाहन करण्यात आले. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
नांगरे पाटलांचे आवाहन
नमस्कार मित्रांनो, काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे. ते माझ्या काही संपर्कांना खाली दिलेले संदेश पाठवत आहेत. मी तातडीने कायदेशीर कारवाई करत आहे. परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती सामायिक करू नका. कारण हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे! धन्यवाद…” असं लिहीत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सतर्क केलं आहे.
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले :
विशेषतः समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांचे बनावट खाते तयार केले जाते. त्यांच्या मित्रांना मैत्री करण्याबाबत संदेश पाठवले जातात. काही दिवसांनी अधिक लोक जोडल्या गेल्यावर, त्या खात्याचा उपयोग करून आर्थिक अडचणीत असल्याच सांगत पैशांची मागणी केली जाते. त्यात काही नागरिक फसले जातात आणि सरळ मदतही करतात. मात्र असं पैसे पाठवताना तो नंबर कोणाचा आहे? याची खात्री केली जात नाही आणि सरळ पैसे दिले जातात अशा फसवणगिरी पासून सावध राहण्याचा आवाहन सायबर सेल कडून करण्यात आले आहे.
एमटीव्ही रोडीजचा धमाकेदार प्रोमो जारी…रिया चक्रवर्ती दिसणार अॅक्शन मोडमध्ये
अशी थांबवा फसवणूक :
आर्थिक फसवणूक पासून बचाव करण्यासाठी सायबर सेल तर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. एखाद्या समाज माध्यमांवर मदतीचे आवाहन आल्यावर सर्वात आधी संबंधित व्यक्तीला त्याबाबत विचारणा करणे गरजेचे आहे. इतकच नाही तर पैसे पाठवताना ते नेमके कोणाच्या खात्यात जात आहे याची शहानिशा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्याचं कळाल्यावर 24 तासाच्या आत तक्रार केल्यास बँकेचे व्यवहार थांबवणे शक्य आहे. त्याचबरोबर ज्याच्या खात्यावरून ही मदत मागितली गेली, ती संबंधित व्यक्ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून व तयार केलेले खोटे खाते बंद करू शकते. याबाबत सायबर सेल कडून माहिती देखील देण्यात आली आहे.