“शिवसेनेच्या स्टाईलनेच माझी प्रतिक्रिया, मला पश्चात्ताप नाही”, कँटीनमधील राड्यावर आ. गायकवाड रोखठोक बोलले

मला जर कुणी विष खाऊ घालत असेल तर मी काय त्याची पूजा करू का, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही.

Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : ‘मला जर कुणी विष खाऊ घालत असेल तर मी काय त्याची पूजा करू का, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही. जर कुणी अंगावर चालून येत असेल तर त्याला भिडा हीच त्यांची शिकवण होती. त्याच पद्धतीने मी प्रतिक्रिया दिली. मला याचा कोणताही पश्चात्ताप नाही’, अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली. आमदार निवासातील कँटीनमध्ये निकृष्ट जेवण मिळालं म्हणून आ. गायकवाड यांनी येथील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मुद्द्यावर विरोधकांनी गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

या प्रकरणी सविस्तर माहिती देताना आमदार गायकवाड म्हणाले, ‘मी 1986 पासून मुंबईत येत आहे. मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून आम्ही आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनमध्ये जेवण घेत असतो. काल रात्री सुद्धा मी नेहमीप्रमाणे जेवणाची ऑर्डर दिली होती. एक घास खाल्ल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यात काहीतरी गडबड आहे. दुसरा घास घेतल्याबरोबर मला त्या ठिकाणी उलटी झाली. मी तसाच त्या कँटीनमध्ये आलो. कँटीनचालकाला याबाबत विचारणा केली. जेवण ज्यांनी दिलं त्या लोकांना मी बोलवायला सांगितलं. त्यांना मी या अन्नाचा वास घ्यायला सांगितलं. त्यानंतर तेच लोक म्हणाले की हे अन्न खराब आहे. मग मी मॅनेजरला बोलावलं त्यालाही दाखवलं. लोकांनाही दाखवलं. सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही तर सडलेलं, कुजलेलं जेवण आहे. त्यामुळे माझी तशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटली.’

शिळ्या जेवणाचा राग! शिंदेंच्या आमदाराचा बनियन अन् टॉवेलवर कँटीनमध्ये राडा; कर्मचाऱ्याला फटकावलं

‘यापूर्वी या कँटीनमध्ये पंधरा दिवसांपूर्वीचं नॉन व्हेज, अंडी यायची. चार पाच दिवसांच्या भाज्या असायच्या. याबाबतीत मी एमडींकडे तक्रारही केली होती. अन्न औषध प्रशासनाला तक्रार दिली. त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजावून सांगितलं. मालकाला तीस वर्षांपासून कंत्राट मॅनेज करून दिले जाते. कोणत्या अधिकाऱ्याचं काय साटंलोटं आहे हे मला सांगता येणार नाही. पण त्याची मुजोरी प्रचंड वाढली आहे. कँटीनच्या किचनमध्ये थांबावं सुद्धा वाटत नाही. कुणाच्या ताटात पाल निघते तर कुणाच्या ताटात उंदीर निघतो अशी येथील अवस्था आहे. आज सोशल मीडियाद्वारे आणि मला फोन करुन लोकं मला सांगत आहेत की आमच्याही बाबतीत असंच घडलं होतं. त्यामुळे माझी प्रतिक्रिया ही शिवसेनेच्या स्टाइलमध्ये होती.’

‘आज उबाठाच्या संजय राऊतने माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. पण दहा वर्षांपूर्वी राजन विचारे यांनी दिल्लीतील कँटीनमध्ये जेवण चांगलं मिळालं नाही म्हणून तेथील वेटरच्या तोंडात पोळी कोंबून त्याला मारलं होतं तो प्रकार या संजय राऊतला दिसला नव्हता का? उबाठाच्या टीकेची आम्ही परवा करत नाही. मी दिलेल्या प्रतिक्रियेचा मला कोणताही पश्चात्ताप नाही. विधिमंडळात जर अध्यक्षांनी मला परवानगी दिली तर हा मुद्दा मी नक्कीच सभागृहात मांडणार आहे. यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे.’

Exit mobile version