Shiv Sena Anniversary : शिवसेनेचा 57 वर्धापन दिन मुंबईत साजरा केला जात आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.
महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे.
यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते. यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, काही दिवसापूर्वी मुंबई महापालिकेतील व्यवहारांचा कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला होता. यावेळी त्यांनी योग्य यंत्रणांमार्फत या प्रकरणी चौकशीचा निर्णय घेऊ अशी घोषणाही केली होती. त्यामुळं मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे.